Does Maoists supports farmers agitation? | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या संपाला माओवाद्यांचा "छुपा पाठिंबा'? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

शेतकऱ्यांच्या संपाला विदर्भात फारसा प्रतिसाद मिळालेला नसताना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभावित कोरची तालुक्‍यात कडकडीत बंद होत असल्याने यामागे माओवाद्यांचा तर छुपा पाठिंबा नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

नागपूर : शेतकऱ्यांच्या संपाला विदर्भात फारसा प्रतिसाद मिळालेला नसताना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलप्रभावित कोरची तालुक्‍यात कडकडीत बंद होत असल्याने यामागे माओवाद्यांचा तर छुपा पाठिंबा नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विदर्भात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी संप मागे घेतला नाही. गडचिरोली तालुक्‍यात तर कुठेच आंदोलन झाली नाही. आज मात्र अचानकपणे कोरची तालुक्‍यात संपूर्ण शेतकऱ्यांनी बंद पुकारला आहे एवढेच नव्हे तर व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा देऊन दुकाने बंद ठेवली आहे. शेतकरी कामावर गेलेले नाहीत, दुकाने बंद असल्याने संपूर्ण कोरची तालुक्‍यातच व्यवहार ठप्प झाले आहे. 

सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष जियाराम हरणे, नगरसेवक हिराजी राऊत, उपसरपंच राजाराम नैताम आदींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी 31 ऑक्‍टोबरपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा मान्य नसल्याचे हरणे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी असल्याचे आरोप त्यांनी केला. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

कोरची तालुका नक्षलप्रभावित आहे. या तालुक्‍यातील राजकीय हालचालींकडे पोलिस व गुप्तचर यंत्रणेचे लक्ष असते. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू नसताना एकाएकी नक्षलप्रभावित कोरची तालुक्‍यात शेतकऱ्यांचे आंदोलनाची धग दिसू लागल्याने पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

संबंधित लेख