do you want fo become CM? then contact AAP | Sarkarnama

फडणवीस यांच्या जागी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसायचंय? मग `आप`शी संपर्क साधा

उमेश घोंगडे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी म्हणजे नवनवीन कल्पनांचे भांडारच. तर या `आप` पक्षाने महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी नवीनच शक्कल लढवली आहे. थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, अशांना पक्षाने मुलाखतीला बोलावले आहे. तुम्ही जाणार का?

पुणे : सामान्य माणसांत आपल्या पक्षाविषयी कुतुहूल निर्माण व्हावे, यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने नवीन फंडा महाराष्ट्रात राबविला आहे.  या पक्षातर्फे संभाव्य मुख्यमंत्रिपदासाठी `वॉक इन इंटरव्ह्यू` म्हणजेच थेट मुलाखत ठेवली आहे. त्यासाठी इच्छुकांनी www.aapmaha.com या वेबसाईटवर जाऊन आपली सविस्तर माहिती नोंदवायची आहे.  पुण्यातील इच्छुकांच्या वॉक इन इंटरव्ह्यू दि. ११ व १२ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात येतील.

भ्रष्टाचारविरोधी आम आदमी पक्षाचा जन्म झाला. देशातील सर्व भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या हृदयात धडकी भरली एका व्यक्तीमुळे.. जननायक अरविंद केजरीवाल ! २०१५ मध्ये केवळ तीन वर्षाच्या आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये ७० पैकी ६७ जागा जिंकत इतिहास रचला होता. अशाच इतिहासाचा पुनरावृत्ती देशभर करण्याचा मानस आहे. 

याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्रात आम आदमी पक्षाने संघटन बांधणी आणि पक्ष विस्तारासाठी कंबर कसली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात सिंदखेड राजा येथे झालेल्या सभेत आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात पक्षाचे रणशिंग फुंकले होते. त्यावेळी पक्षप्रवेश केलेल्या ब्रिगेडियर सुधीर सावंत (माजी खासदार) यांच्याकडे महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे काम जोमात सुरु आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात जिल्हा निरीक्षकांच्या नेमणुका पूर्ण झाल्या आहेत. विधानसभा समित्या बनवण्याचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. आप युथ विंग, छात्र युंव संघर्ष समिती, श्रमिक विकास संघटन, आप महिला विंग, आप ट्रान्सपोर्ट विंग या जनसंघटना व विभाग यांचेही काम वेगात सुरु आहे. 

देशाला एक नव्हे अनेक केजरीवालांची गरज आहे. महाराष्ट्राला सुद्धा अशी गरज असल्याने  आम आदमी पक्ष आता सामान्य माणसांमध्ये मुख्यमंत्री शोधत आहे.  वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत देणाऱ्या प्रत्येकाला संधी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. इच्छुकांनी जनतेमधील स्वतःच्या कामाच्या जोरावर आप पक्षाचा विश्वास जिंकल्यावरच त्यांना आप तर्फे पक्षात सामावून घेतले जाणार आहे. आपले आचार, विचार, बोलणे, चालणे, तुमच्यातील नेतृत्त्वगुण ह्या सगळ्यासाठी पक्ष मेहनत घेईल, असे पक्षाचे पक्षाचे राज्य सचिव सुभाष तंवर सहसचिव अजय मुनोत आणि डाॅ. अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित लेख