do work or go home : warnig to mahavitarn officeials | Sarkarnama

काम करा अन्यथा घरी बसा : महावितरणच्या चुकार अधिकाऱ्यांना शाॅक

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे शहरातील वीजबिल वसुलीच्या आढाव्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. झिरो रिडिंग येणे, ग्राहकांना वेळेवर बिल न मिळणे, एचटी कनेक्शन बिलांची वसुली न होणे अशा बाबींमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. चुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची धमकी खरेच अमलात येणार की पुन्हा ती पोकळच ठरणार, याकडे आता लक्ष आहे.

पुणे : जमत असेल तर काम करा; अन्यथा रजा घेऊन घरी बसा अशा शब्दांत महावितरणच्या वरिष्ठ पण चुकार अधिकाऱयांना प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी फटकारल्याने महावितरणच्या पुणे कार्य़ालयात सध्या तो चर्चेचा विषय झाला आहे. चुकार अधिकाऱ्यांवर केवळ शाब्दिक फटकारे बसणार की त्यांच्यावर खरेच कारवाई होणार, याकडेही त्यामुळे आता लक्ष लागले आहे.

महावितरणच्या पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ताकसांडे यांनी काल घेतली. महावितरणची थकीत वीजबिलांची रक्कम सध्या वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक डोलारा दोलायमान झाला आहे. पुणे शहर व जिल्हा वीजबिल वसुलीत अव्वल असतानाही त्यात थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पुण्यातील रास्ता पेठ आणि गणेशखिंड या विभागातील अधीक्षक अभियंत्यांना त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यातही गणेशखिंड सर्कलची थकबाकी चाळीस कोटींहून अधिक असल्याने ताकसांडे यांनी तेथील अधीक्षक अभियंत्यांना धारेवर धरले. काम जमत नसेल तर थेट घरी पाठविण्याचा इशारा त्यांनी दिला. कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या, कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना विनाकारण त्रास देणाऱया चुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात आता कडक कारवाई करण्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

महावितरणच्या औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक संचालक औमप्रकाश बकोरीया हे अशा अधिकाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करत असल्याचे चित्र आहे. पुणे प्रादेशिक विभाग हा वीजवापरात राज्यात आघाडीवर आहे. येथील आर्थिक शिस्त बिघडली तर त्याचा फटका संपूर्ण राज्याला बसू शकतो. त्यामुळे ताकसांडे यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला खरा. पण ते बकोरीयांप्रमाणे कणखरपणा दाखवणार का, याची उत्सुकता आहे.  

संबंधित लेख