diwali festival by dongaonkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

दिवाळीचा फराळ स्वतः तयार करण्यात वेगळेच समाधान....

अॅड. देवयानी डोणगावंकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, औरंगाबाद
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018


औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट देवयानी डोणगावंकर अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या आणि घरातली कामे याचा समतोल साधून कामाचे परिपूर्ण नियोजन करून दिवाळीचा फराळ स्वतः तयार करतात. त्याचबरोबर दिवाळीचा सण आपल्या मूळ गावी म्हणजे डोणगावला साजरा करण्याची सासऱ्यांनी सुरू केलेली परंपराही पुढे नेत आहेत. एकाच वेळी फराळाचे सगळे पदार्थ तयार न करता टप्याटप्याने करायला घेऊन त्यांनी ते वेळेत पूर्णही केले. दिवाळी फराळ स्वतः तयार केल्याशिवाय मला समाधान मिळत नाही असं त्या आवर्जून सांगतात 

दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच त्याची आतुरतेने वाट पहात असतात. या निमित्ताने साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, फटाके, कपडे खरेदी याची लगबग असतेच. याशिवाय खमंग, चविष्ट फराळाचे निरनिराळे पदार्थ तयार करून ते नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ठांना खाऊ घालण्याचे समाधान वेगळेच.

राजकारणात येण्याआधी या सगळ्या गोष्टींचे नियोजन, तयारीला भरपूर वेळ मिळायचा. आता राजकारणात सक्रीय झाल्यामुळे कमी वेळ मिळत असला तरी त्याचा दिवाळीच्या फराळ किंवा इतर तयारीवर मी कुठलाही परिणाम होऊ दिलेला नाही. 

राजकारण आणि घर या दोन्ही गोष्टी स्वतंत्र ठेवण्याची कसरत मी यशस्वीपणे पार पाडतेय. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आलेली जबाबदारी, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, त्या निमित्ताने वाढलेले दौरे, सातत्याने होणाऱ्या बैठका यामुळे निश्‍चितच काही मर्यादा आल्या आहेत. पण जनतेसाठी मी हा वेळ देतेय याचे समाधानही आहे. राजकारण आणि जनसेवेचे कामे सांभाळत सण देखील तितक्‍याच उत्साहाने साजरे करण्यावर माझा भर आहे. 

फराळासाठी शॉर्टकट वापरला नाही.. 
सध्या रेडीमेट फराळाचा ट्रेंड आहे. त्यामुळे बाजारातून तयार फराळाचे पदार्थ आणून दिवाळी साजरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हा शॉर्टकट मला मात्र मान्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतील नियोजित कार्यक्रम, बैठका, जिल्ह्यातील दौरे याचे निश्‍चित वेळापत्रक तयार करून मी दिवाळीच्या तयारीला देखील तेवढाच वेळ दिला.

अगदी आज घरातले कुठले काम करायचे, फराळाचा कुठला पदार्थ बनवायचा हे ठरवून ते त्या त्या वेळेत पूर्ण करण्याकडे बारकाईने लक्ष दिले. जिल्हा परिषदेतील दैनंदिन कामामुळे दरवर्षी पेक्षा यंदा दिवाळी फराळाची तयारी खूप आधीच सुरू केली. 

एकाच वेळी सगळे पदार्थ तयार न करता टप्याटप्याने करायला घेतले आणि वेळत पूर्णही केले. स्वतः दिवाळी फराळ तयार केल्याशिवाय मला समाधान मिळत नाही. शेवटी बाजारातून विकत आणलेल्या आणि हाताने तयार केलेल्या फराळाची चव यात निश्‍चितच फरक असतो. त्यामुळे वेळेचा किंवा काम असल्याचा बडेजाव न करता चिवडा, लाडू, चकल्या, करंज्या, अनारसे, शंकरपाळे इत्यादी सगळे पदार्थ मी बनवले. 

गावकऱ्यांसाबेत दिवाळी आणि फराळही 
दिवाळीचे लक्ष्मीपूजन केल्यानंतर पाडवा आणि भाऊबीजेला आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजे डोणगांवला जातो. तिथे आमचे जुने घर आहे. माझे सासरे दिवंगत साहेबराव पाटील डोणगांवकर (अण्णा) यांनी गावातील लोकांसोबत दिवाळी साजरी करण्याची सुरू केलेली परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत. पाडवा, आणि भाऊबीजेच्या दिवशी आम्ही डोणगांवकर कुटुंबिय गावात एकत्रित येतो

. तिथे गावातील लहान-थोर मंडळी जमतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. या निमित्ताने गावातील लोक आपल्या अडीअडचणी, प्रश्न देखील मांडतात. ते सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करतो. दिवाळी निमित्त घरी आलेल्या गावातील प्रत्येकाशी आमचे आपुलकीचे नाते तयार झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत दिवाळी आणि खमंग फराळाचा आस्वाद घेण्याची परंपरा आजही कायम आहे. 

( शब्दांकनः जगदीश पानसरे )
 

संबंधित लेख