Diwakar Raote taunts Chandrakant Khaire | Sarkarnama

खैरे हायकमांडकडे गेले म्हटल्यावर माझ काय चालणार?  : दिवाकर रावते  

जगदीश पानसरे 
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

हे दोघे नेते एकत्र आल्यावर परस्परांना शालजोडीतील लगावल्या शिवाय राहत नाहीत . आजही त्यांनी उपस्थितांची निराशा केली नाही तर करमणूक  केली !

औरंगाबादः स्मार्टसिटी अंतर्गत महापालिका व परिवहन मंडळाच्या वतीने शहरात सव्वाशे बस चालवण्याचा करार करण्यात आला आहे. या कराराची अधिकृत घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (ता. 10) केली. या निमित्ताने खासदार खैरे आणि दिवाकर रावते बऱ्याच दिवसांनी एकत्र आले होते. हे दोघे नेते एकत्र आल्यावर परस्परांना शालजोडीतील लगावल्या शिवाय राहत नाहीत . आजही त्यांनी उपस्थितांची निराशा केली नाही तर करमणूक  केली !

 " खैरेचे काम कसे असते तुम्हाला माहितच आहे असे म्हणत रावतेंनी त्यांना चिमटा काढला, तर रावते माझे गुरु आहेत, आणि गुरू-शिष्यामध्ये वाद, संघर्ष होतच असतात असे सांगत खैरेंनी देखील दोघांमधील वादाला एकप्रकारे जाहीर कबुलीच दिली. 

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील सख्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दोघेही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. पण जिल्हा आणि मराठवाड्याच्या राजकारणात रावतेंचा हस्तक्षेप वाढला आणि रावते-खैरे वादाला सुरुवात झाली. 

आजही जिल्ह्यात रावते आणि खैरे यांना मानणारे दोन गट असल्याचे बोलले जाते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण आणि अभिवादन कार्यक्रमाला यापुर्वी खैरे आणि रावते एकत्र आले होते. पण त्यावेळीही या दोघांमध्ये फारसा संवाद झाला नव्हता. 

स्मार्टसिटी अंतर्गत परिवहन मंडळ आणि महापालिकेत झालेल्या कराराची माहिती देण्यासाठी शिवसेनेतील हे दोन नेते बुधवारी एकत्रित आले होते. ही संधी साधत पत्रकारांनी देखील या दोघांनाही तिरकस प्रश्‍न विचारत बोलते केले. यावेळी दोघांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला होता. 

शहरात बस सुरु करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी थेट हायकंमाडकडे धाव घेतल्याचा उल्लेख करत रावतेंनी खैरेंना चिमटा काढला."  खैरे हायकमांडकडे गेले म्हटल्यावर माझ काय चालणार? खैरेचे काम कसे आहे तुम्हाला माहित आहे? शहराचा स्मार्टसिटीत समावेश झाला हे बरे झाले नाही तर खैरेची अडचण झाली असती,"  असा टोला  रावतेंनी लगावला. 

रावते यांच्या टोचाटोचीनंतर संधी मिळालेल्या चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्याने संयमित भूमिका घेत "दिवाकर रावते हे माझे गुरू आहेत, त्यामुळे गुरु-शिष्यामध्ये संघर्ष, वाद होतच असतात," असे सांगत विषयाला पुर्णविराम दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख