diwakar raote about prithviraj chavhan | Sarkarnama

पृथ्वीराजबाबांनी सुंदर गाठी मारुन ठेवल्या आहेत, त्या आजही सोडता येत नाहीत!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

एखादा वाघ पिंजऱ्यात आणून ठेवल्यानंतर काय होईल, तशीच परिस्थितीत पृथ्वीराजबाबांची महाराष्ट्रात आल्यानंतर झाली.

कोल्हापूर : एकेकाळी पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था महाराष्ट्रात येवून पिंजऱ्यातील वाघासारखी झाल्याचा टोला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लावला. 

गारगोटी येथे कै.सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात रावते यांनी चांगलीच बॅटींग केली. 

मंत्री रावते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. संपूर्ण देशाचे प्रश्‍न समजून घेण्याची त्यांना संधी होती. त्यांच्यावर नेतृत्वाचा खूप विश्‍वास होता. सर्वच्या सर्व प्रश्‍नांची माहिती असलेले चव्हाणांचे नेतृत्व होते. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. मात्र असा मुक्‍त संचार करणारा एखादा वाघ पिंजऱ्यात आणून ठेवल्यानंतर काय होईल, तशीच परिस्थितीत पृथ्वीराजबाबांची महाराष्ट्रात आल्यानंतर झाली असल्याचा टोला मंत्री रावते यांनी लोवला. 

बाबा हे सभागृहात तळमळीने बोलतात. बाबांनी मुख्यमंत्री असताना अनेक सुंदर गाठी मारुन ठेवल्या आहेत, त्या आजही सोडता येत नसल्याची कोपरखळी रावते यांनी मारताच समारंभस्थळी एकच हशा पिकला. 

मंडलिकांचा विजय अविस्मरणीय 
सन 2009 च्या निवडणुकीत कै. सदाशिवराव मंडलिक यांनी स्वाभिमान दाखविला. ते लढवय्ये नेते होते. तळागाळात पोहोचलेले नेते होते. जनतेच्या मनावर अधिराज्य असलेला नेता काय असतो, हे त्यांनी दाखवून दिले.पक्षाने तिकीट नाकारल्यानंतरही जनतेने मात्र मंडलिक यांनाच निवडून दिले. जनतेचे नेते मंडलिकच असल्याचे सिध्द केले, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

संबंधित लेख