Disturbed Shivsainiks in Parbhani Held Secret Meeting | Sarkarnama

परभणीतल्या अस्वस्थ शिवसैनिकांची गुप्त बैठक

गणेश पांडे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

परभणी जिल्ह्यात शिवसेनेतील अतंर्गत बंडाळी जगजाहीर झाली आहे. या बंडाळीमुळे शिवसेनेवर प्रेम करणारा सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ झालेला आहे. कुणाकडे जावे अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांची भिती मनात घर करून बसली आहे.

परभणी : पक्षातंर्गत मतभेदामुळे अस्वस्थ झालेल्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीत परभणीचा बालेकिल्ला कसा अभेद्य राहील, यावरच चर्चा करण्यात आली. पुढाऱ्यांच्या मतभेदामुळे पक्षाची हानी नको असा सुर देखील या बैठकीत निघाला. मात्र, या बैठकीला पक्षाचा एकही बडा लोकप्रतिनिधी हजर नव्हता हे विशेष.

परभणी जिल्ह्यात शिवसेनेतील अतंर्गत बंडाळी जगजाहीर झाली आहे. या बंडाळीमुळे शिवसेनेवर प्रेम करणारा सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ झालेला आहे. कुणाकडे जावे अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांची भिती मनात घर करून बसली आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून शिवसेनेचा भगवा सतत फडकत आलेला आहे. शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदूत्वाचे विचार रगा रगात भिनलेल्या येथील शिवसैनिकांनी पक्षाने कोणताही उमेदवार दिला तर त्याला निवडून आणायचेच असे ठरवूनच टाकलेले आहे. 

त्यामुळे सलग चार टर्मपासून शिवसेनेची सत्ता परभणी विधानसभा व लोकसभेवर अबाधीत राहील आहे. पंरतू गेल्या चारवर्षापासून शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे शिवसेनेवर प्राणापेक्षाही जास्त प्रेम करणारा सर्वसामान्य मतदार व शिवसैनिक व्यथित झालेला दिसून येतो. दोन मोठ्या नेत्यामधील वादामुळे कोणाकडे जावे असा प्रश्न या शिवसैनिकाला पडलेला आहे. याला बोलले तर त्याला राग व त्याला बोलले तर याला राग अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे अस्वस्थ असलेल्या जवळपास 250 शिवसैनिकांनी बुधवारी एक गुप्त बैठक घेतली. 

या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची स्थिती कमजोर होता कामा नये यासाठी एकसंघ राहून विजय संपादनच करायचा असा ठाम निर्धार या बैठकीत घेण्यात आला आहे. नेत्यांच्या भांडणामुळे शिवसैनिक विभागला जाता कामा नये, अशी शपथही या वेळी घेण्यात आली असल्याचे समजते. या बैठकीत जिल्हा प्रमुख विशाल कदम वगळता कोणताही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख