Dissidence growing in congress against Sanjay Nirupam | Sarkarnama

निरुपम यांच्या एकाधिकारशाहीने कॉंग्रेसला मुंबईत खिंडार  पडणार?  

सरकारनामा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

कृपाशंकर सिंह यांचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे जवळचे संबध असल्याचे सांगितले जाते. 2014 मध्येच कृपाशंकर उत्तर प्रदेश मधून विधानसभा लढणार होते मात्र ते शक्‍य झाले नाही.त्यानंतर इडीची चौकशी चा ससेमिरा ही संपला आहे.त्यामुळे त्यांची वाट सुकर झाल्याचे मानले जाते.

  मुंबई  :  मुंबई कॉंग्रेसचे  अध्यक्ष संजय निरूपम यांच्या एकहाती कारभारामुळे  कृपाशंकर सिंह काँग्रेसपासून दुरावले असून स्वर्गीय गुरुदास कामत यांच्या गटाचे निष्ठावंत देखील अस्वस्थ आहेत . त्यामुळे मुंबई काँग्रेसला निवडणुकांपूर्वी मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे . 

माजी केंद्रीय मंत्री गुरूदास कामत यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या निष्ठावान समर्थकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे . कामत समर्थकांची सध्या  चलबिचल सुरू आहे.

त्यातच मुंबई कॉंग्रेसचे सध्याचे अध्यक्ष संजय निरूपम सर्वाना सोबत घेऊन चालण्याऐवेजी आपल्या मनाला येईल तसा  कारभार  करीत आहेत . कामत गटाचे निष्ठावान दुखावले जात असल्याचे बोलले जात आहेत.यामुळे आगामी काळात कॉंग्रेस पक्षाला मुंबईत भगदाड पडले तर नवल वाटायला नको.

यातच भाजपने मुंबईत पक्षविस्ताराच्या हालचाली सुरु केल्या आहेत . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेस्टिवल डिप्लोमसी सुरु केली असून अन्य पक्षातील मोठ्या नेत्यांशी थेट संवाद सुरु केला आहे .  मुंबईत याचा फटका कॉंग्रेसला बसेल असे मानले जाते .  

माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जाते. यापुर्वी देखील कामत यांचे विश्वासू समिर देसाई ,धर्मेश व्यास तसेच माजी आमदार कृष्णा हेगडे,राजहंस सिंह यांनी कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आहे.कृपाशंकर यांचाही भाजपच्या वाटेने प्रवास सुरू असल्याचे बोलले जाते. 

गेले अनेक दिवस कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री कृपा शंकर सिंह भाजप मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे.याला पुष्टी म्हणजे गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळात वेळ काढून सिंह यांच्या घरी हजेरी लावल्याने कृपाशंकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. 

 आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर विद्यमान मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत  कृपाशंकर सिंह यांचे जमले नाही. ते कॉंग्रेसच्या अनेक कार्यक्रमापासून सिंह दूर राहणेच पसंत करतात. 

 माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचेही कधीच  पटले नाही . कामत यांनी निरुपम यांच्या मनमानी कारभाराला वैतागून  काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते .

कामत यांच्या निधनानंतर  कामत यांच्या कार्यकर्त्यांनीही निरुपम यांच्यावर नाराजी दाखवत पक्षाच्या कार्यक्रमांकडे अनेकदा पाठ फिरवली आहे. 

निरुपम यांच्यावर नाराजी व्यक्त करत याआधी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला.   

मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आघाडी सरकारच्या काळात चौकशी सुरू होती. त्यामुळे ते अडचणीत आले होते.

त्यांना मात्र त्यांना कोकणातील शेकडो एकर जमिनीच्या प्रकरणात नुकतीच क्‍लीन चिट मिळाली असून अन्य प्रकरणात अजूनही ते चौकशीचा फेऱ्यात आहेत.

कृपाशंकर यांच्या घरी मुख्यमंत्री पोहचल्याने कॉंग्रेसच्या गोटात आश्‍चर्य व्यक्त केले जात नाही. याबाबत बोलण्यास  कॉंग्रेस नेत्यांनी नकार दिला आहे. 

संजय निरुपम यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे . एकेकाळी मुंबईतुन निवडून येणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या खूप जास्त असे . आताही राज्यात काँग्रेसला कमबॅक करायचे असेल तर मुंबईतून काँग्रेसचे आमदार जास्त निवडून यायला हवे .

पण काँग्रेस संघटनेचे सध्याचे स्वरूप पाहता हे जरा अवघड दिसते . संजय निरुपम यांनी आपली कार्यपद्धती बदलून सर्वाना सोबत घेण्याचे धोरण स्वीकारले नाही तर भविष्यात काँग्रेसला खिंडार पडू शकते . 
 

संबंधित लेख