Director of higher education suspended | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने निलंबित

सिद्धेशवर डुकरे :सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 एप्रिल 2017


औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2012 मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग 3मधील 53 पदांवर चुकीच्या पध्दतीने नियम डावलून भरती करण्यात आल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयाने 2014 मध्ये चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली होती.

मुंबई: औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2012मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग 3पदांवर नियमबाहय व चुकीच्या नियुक्‍त्या झाल्याचा ठपका ठेवलेले उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.

तसेच, या मराठवाडा विद्यापीठांमधील नियुक्‍त्यां संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यासाठी मंत्रालयातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाल-ढकल केली अथवा पाठीशी घातले अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 2012 मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग 3मधील 53 पदांवर चुकीच्या पध्दतीने नियम डावलून भरती करण्यात आल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयाने 2014 मध्ये चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली होती. या समितीने आपला सविस्तर अहवाल शासनास या पूर्वीच सादर करुन या प्रक्रियेतील अधिकाऱ्यांविरुध्द नियमबाहय व चूकीच्या नियुक्‍त्यांचा ठपका ठेवला होता. या नियुक्‍त्या संबंधित प्राधिकरणाच्या अनुमती शिवाय बेकायदेशीर व मनमानी पध्दतीने केल्याचे अहवालात नमूद केले होते. तरीही संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात मंत्रालयातील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा मुद्दा सुभाष साबणे, अतुल सावे, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा आदी सदस्यांनी उपस्थित केला आणि दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आग्रही मागणी त्यांनी तावडे यांच्याकडे केली. सदस्यांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी डॉ. धनराज माने यांना निलंबित करण्याची घोषणा केली. तसेच, या प्रकरणात कोणताही अधिकारी कितीही ज्येष्ठ असला तरीही त्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येईल असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित लेख