Dip in income triggers gossip in Nasik market committee | Sarkarnama

नाशिक बाजार समितीचे  उत्पन्न अचानक घटल्याने चर्चा 

संपत देवगिरे
रविवार, 30 एप्रिल 2017

"अध्यक्ष नसल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. उत्पन्नही घटले आहे. संचालकांमधून कोणीतरी अध्यक्ष व्हावा असे आमचे प्रयत्न आहेत.'- तुकाराम पेखळे, संचालक, नाशिक बाजर समिती. 

नाशिक: नाशिक बाजार समितीचे अध्यक्ष देविदास पिंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने समितीच्या अंतर्गत राजकारणात मोठे फेरबदल घाटत आहेत.

काही संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत.  त्यासाठी श्री. पिंगळे यांचे संचालकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे.

समितीचे मासिक उत्पन्न निम्म्यावर आल्याने जिल्हा बॅंकेपाठोपाठ बाजार समितीचा प्रवासही अडचणीकडे सुरु झाल्याची चर्चा आहे. 

बाजार समितीच्या अध्यक्षांना चार महिने समितीच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचे निर्देश जामीन मंजुर करतांना न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सध्या अध्यक्षांशिवाय कामकाज सुरु आहे. यातील बहुतांश संचालक पिंगळे यांच्याशी संबंधीत आहेत.

सातत्याने कामकाजात भाग न घेतल्यास तांत्रीक कारणाने त्यांचे संचालक पद रद्द करण्यासाठी सहकार उपनिबंधक कार्यालयाचा आधार घेण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदारांकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. 

मात्र बाजार समितीवर झेंडा फडकवण्याचे मनसुबे रचणाऱ्या भाजपने जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणूकीत पिंगळेंचे खंदे समर्थक असलेल्या तुकाराम पेखळे, विश्वास नागरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूकीत भाजपला यश आले नाही मात्र त्यानंतर बाजार समितीतील राजकीय स्थितीचा लाभ घेण्यासाठी हे दोघेही अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून सध्या बहुतांश संचालकांना कामकाजाची माहिती दिली जात नसल्याचा आरोप आहे. यासंदर्भात आठ संचालकांनी प्रशासनाला पत्र दिले असून कामकाजाची माहिती देण्याची मागणी केल्याचे कळते.

गाळ्यांचे हस्तातंरण, बाजार शुल्क यांसह विविध आर्थिक कामकाज करतांना राजकीय हेवेदाव्यांत बाजार समितीचे मासिक उत्पन्न एक कोटीहून अधिक असतांना सध्या ते निम्म्यावर आल्याचे बोलले जाते. यात जिल्हा बॅंकेपाठोपाठ बाजार समितीची वाटचालही आर्थिक आरीष्टाच्या दिशेने होण्याची भिती आहे. 

संबंधित लेख