dinkararo jadhav working for his sons politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

88 वर्षाचे माजी आमदार दिनकरराव धडपडताहेत मुलाच्या आमदारकीसाठी!

सदानंद पाटील 
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

जुन्या काळातील साधा-सरळ आमदार म्हणून दिनकरराव जाधव यांची ख्याती आहे.

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेले 88 वर्षीय माजी आमदार दिनकरराव जाधव (दादा) यांनी पुत्र सत्यजित जाधव यांना आमदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या वयातही दादांची उर्मी पाहून कार्यकर्तेही थक्‍क झाले आहेत. 

आत्तापर्यंत या मतदार संघात मागेल त्याला मदत करणारे अशी दिनकरराव जाधव यांची ओळख आहे. मात्र सत्यजित यांनाच आमदार करण्यासाठी जाधव गट सक्रीय झाल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपच्या संभाव्य उमेदवारांना धास्ती लागली आहे. 

सत्यजित यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी दिनकरराव जाधव प्रयत्न करत आहेत. मात्र जर कॉंग्रेसने उमेदवारी दिली नाहीतर भाजपचा पर्याय देखील खुला असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. 

जिल्ह्यातील अंदाज न बांधता येणारा मतदारसंघ अशी राधानगरी-भुदरगड मतदार संघाची ख्याती आहे. वारंवार भाकरी परतण्यात येथील मतदार तरबेज आहेत. कोणाच्याही शिडात हवा शिरली की ती काढून घेण्याची किमया येथील मतदार करतात. त्यामुळे येथील आमदाराला जमिनीवरच रहावे लागते. मतदारांचा अंदाज बांधता येत नसल्याने सर्वच उमेदवार सावध भूमिका घेत आहेत. संभाव्य उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असून नव्यानेही काही उमेदवारांची भर पडत आहे. यातच आता माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित यांची भर पडली आहे. 

जुन्या काळातील साधा-सरळ आमदार म्हणून दिनकरराव जाधव यांची ख्याती आहे. 1978 व 1982 यो दोन टर्मला जाधव यांनी आमदारकी मिळवली. तर 15 वर्षे बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले. यानंतर जाधव यांनी अनेकांना आमदार करण्यास मदत केली.मात्र आता जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव यांनी यावेळी दंड थोपटले आहेत.

सत्यजित जाधव यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद कामकाजाचा अनुभव आहे. सत्यजित जाधव यांच्या प्रचारासाठी 88 वर्षे वय असलेले दिनकरराव जाधव या दोन्ही दुर्गम तालुक्‍यातील लोकांच्या भेटीगाठी घेत असल्याचे पाहून, सर्वपक्षीय कार्यकर्तेही आश्‍चर्यचकीत होत आहेत.
 

संबंधित लेख