मंगलदास बांदल म्हणतात, `दिलीप वळसे-पाटील लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत'

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून थेट माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनाच उमेदवारी देण्याची चर्चा राज्यभर सुरू असली तरी वळसे-पाटील लोकसभेला उभे राहणार नाहीत असा गौप्यस्फोट या निवडणुकीत `राष्ट्रवादी'कडून इच्छुक असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी नुकताच केला.
मंगलदास बांदल म्हणतात, `दिलीप वळसे-पाटील लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत'

शिक्रापूर : शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून थेट माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनाच उमेदवारी देण्याची चर्चा राज्यभर सुरू असली तरी वळसे-पाटील लोकसभेला उभे राहणार नाहीत असा गौप्यस्फोट या निवडणुकीत `राष्ट्रवादी'कडून इच्छुक असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी नुकताच केला. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे वळसेपाटील यांच्याशी याच अनुषंगाने चर्चा नुकतीच झाल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात राष्ट्रवादीच्या  राज्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणूकीत उतरविण्याच्या पक्षाच्या धोरणानंतर ’आपण या यादीत नसल्या’चे यापूर्वीच छगन भुजबळ व गणेश नाईक यांनी जाहिर केल्यानंतर वळसे पाटलांची अधिकृत भूमिका स्पष्ट झाली नसल्याने बांदल यांचे वक्तव्य नक्कीच महत्वाचे आहे.

शिरुर लोकसभा निवडणूकीत अपयशाच्या `हॅट्रीक’चे शल्य राष्ट्रवादीला सर्वाधिक आहे. कारण राष्ट्रवादीचे ’होमपिच’ असलेल्या पुणे जिल्ह्यात हे अपयश तीन पंचवार्षीक धूवून काढता आलेले नाही. विशेष म्हणजे खासदार आढळराव यांच्या विरोधात एकही उमेदवार पक्षाला गेल्या पंधरा वर्षात नीटपणे ’प्रोजेक्ट’ करता आलेला नाही. अर्थात ही स्थिती या चौथ्या वेळेलाही वेगळी नाही. 

याच पार्श्वभूमिवर यावेळी पक्षाने देशभरातील `महाआघाडी’च्या प्रयोगात पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी असलेली संधी पाहता राज्यातून पक्षाचे किमान दहा खासदार देण्याची रणनिती आखल्याची चर्चा आहे. त्यात राज्यातील पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते लोकसभेला उभे करण्याचे ठरले आणि त्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. 

गेल्या चार दिवसांतील घडामोडींमध्ये छगन भुजबळ व गणेश नाईक यांनी लोकसभेबाबत आपण तयार नसल्याचे जाहिर केले असताना वळसे पाटील यांनी मात्र कुठलीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नसल्याने ते नक्की उमेदवार असल्याची पक्षकार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरात चर्चा सुरू आहे. 

याच पार्श्वभूमिवर वळसे पाटील यांनी शुक्रवारी (दि.१५) माजी सभापती मंगलदास बांदल यांना आपल्या मंचर (ता.आंबेगाव) येथील कार्यालयात बोलावून घेवून तब्बल पाऊन तास चर्चा केल्याची बातमी संपूर्ण मतदार संघात कळाली, मात्र तरीही वळसे पाटील यांनी आपली कुठलीच अधिकृत भूमिका जाहिर केली नाही. याच पार्श्वभूमिवर शिरुर लोकसभा मतदार संघात गेल्या दोन महिन्यांपासून शड्डू ठोकून असलेले माजी सभापती मंगलदास बांदल यांनी या बैठकीबाबत सांगितले की, एका जुन्नर येथील नेत्याच्या उपस्थितीत आमची चर्चा झाली आणि खुप सकारात्मक झाली. यावेळी काहीही करुन खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभूत करण्याबाबतही आम्ही बोललो. अर्थात वळसे पाटील यांनी आपल्याला स्पष्ट सांगितले की, मी काही लोकसभेला उभा राहणार नसून शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार होण्याकरीता आपण एकजुटीने काम करायला हवेय. याबाबत आपणही या त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत आपण कामाला लागत असल्याचेही त्यांना सांगितल्याचे पैलवान मंगलदास बांदल यांनी `सरकारनामा’शी बोलताना सांगितले.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com