dilip patil on raju shetty | Sarkarnama

शेट्टींची आत्मक्‍लेश यात्रा फसवी : दिलीप पाटील 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मे 2017

कारखाने व सरकार एफआरपी देण्यासाठी बांधिल असताना श्री. शेट्टी यांनी जाणीवपूर्वक बारामती शरद पवार यांच्या दारात, हर्षवर्धन पाटील यांच्या गावांत आंदोलन केले. यातून त्यांनी बहुजन समाजाच्या नेत्यांनाच टार्गेट केले आहे. भाजपा हे जातीयवादी आहेत, म्हणून पुर्वी त्यांचा विरोध होता. आता श्री. शेट्टीच त्यांच्यासोबत आहेत आणि तेही जातीयवादी आहेत हे यापुर्वीच्या आंदोलनावरून दिसून येते असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आत्मक्‍लेश यात्रा फसवी आहे. यात्रेच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्त्व टिकवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप "गोकुळ'चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील (शिरोळ) यांनी पत्रकार परिषदेत केला. 

श्री. पाटील म्हणाले,"केंद्रात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना झालेल्या कर्जमाफीनंतर श्री. शेट्टी यांनीच ही कर्जमाफी धनदांडग्यांसाठी असल्याचा आरोप करून लेखी तक्रार केली. त्यांच्यामुळेच जिल्ह्यातील 46 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी अपात्र ठरली. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केला, त्यांचाच आता श्री. शेट्टी यांना कळवळा का आला आहे ? यामागे काहीतरी गौडबंगाल आहे.' 

ते म्हणाले,"दूध संघातील पांढऱ्या कपड्यातील काळे बोके संपूर्ण मलई खातात असा आरोप श्री. शेट्टी यांनी केला होता. मात्र, दूध आंदोलन करून दुधासारखा पवित्र आणि पूर्ण अन्न असलेल्या पदार्थाची नासाडी त्यांनी केली. त्यांनी शिरोळ तालुक्‍यात "स्वाभिमानी'च्या नावाने दूध संघ सुरू केला. उत्पादकाला दोन रूपये जादा दर दिला जाईल असे सांगितले, आज या संघाची परिस्थिती काय आहे ? या संघात ग्राहकांकडून पैसे उकळले जातात, पण उत्पादकाला इतर संघापेक्षा प्रती लिटर एक रूपया कमीच दिला जातो. त्यानंतर आजअखेर या बहाद्दराने दूध शब्दही काढलेला नाही. त्यांनी दूध आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून केले याचाही गौप्यस्फोट आपण लवकरच करू.' 

ते म्हणाले,"उसाला दर मिळावा यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात जरूर प्रयत्न केले. पण अलिकडे इतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी प्रतीटन 3500 ते 4000 रूपयांची मागणी करत असताना यांनी मात्र एफआरपीपेक्षा 175 रूपये जादा का घेतले ? सरकारसोबत असूनही त्यांनी एफआरपीशिवाय कोणतीही मागणी केली नाही. आता ऊस दराचा कायदाच झाला आहे, त्यांनी आंदोलन केले काय आणि नाही काय कायद्याने कारखान्यांना एफआरपी द्यावीच लागणार आहे, त्यात श्री. शेट्टी यांचे योगदान काय ?' यावेळी बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील उपस्थित होते. 

म्हणून त्यांचा आत्मक्‍लेश 

शेतमालाला दर नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत. या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण कर्जमाफी व हमी भाव मिळावा यासाठी दोन्ही कॉंग्रेससह आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, बळीराजा संघटना यांनी संघर्ष यात्रा सुरू केली. विरोधकांच्या या आक्रमक भुमिकेमुळे सरकार कर्जमुक्‍ती करण्याच्या मानसिकतेत आहे, हे ओळखूनच श्री. शेट्टी यांनीही आत्मक्‍लेश यात्रा सुरू केली आहे. कर्जमुक्ती झालीच तर त्याचे श्रेय आपल्याला लाटता यावे यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. 

 

संबंधित लेख