Dilip Kambale pl visit constituency | Sarkarnama

दिलीपभाऊ, हरवल्याचा फलक लागायच्या आधी प्रगट व्हा! 

पांडुरंग सरोदे
बुधवार, 5 जुलै 2017

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे आपल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याविषयी नाराजी आहे. ही नाराजी ओळखून तातडीने कांबळे यांनी मतदारांच्या समस्यांची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले दिलीपभाऊ कांबळे दुसऱ्यांदा मंत्रिपदापर्यंत पोहोचले. ही जागा भाजप जिंकेल, असे भाऊंनाही वाटले नसावे. पण मोदी लाटेत पुण्यातील आठही जागा भाजपला मिळाल्या. दिलीपभाऊ परत आमदार झाले. भाऊंचे नशीब येथेच थांबले नाही. त्यांना डबल लॉटली लागली. सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. तेव्हापासून भाऊंचा वारू चौफेर उधळायला सुरवात झाली. दिलीपभाऊ देखील हवेत आहेत की जमिनीवर, असा प्रश्न पडावा अशी त्यांची कामगिरी आहे. 

अण्णा भाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध जोरदार टीका करण्याचे काम त्यांनी केले. एवढेच नव्हे, तर "राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्यांच्या नावावर महामंडळाची कर्जे उचलून महागड्या गाड्या घेतल्या. त्यांची नावे दोनच दिवसांत जाहीर करू.' असे वर्षभरापूर्वी त्यांनी जाहीर केले होते. "तो' दिवस अद्यापही उजाडला नाही. "अजित पवारांना तुरुंगात टाकू' ही त्यांची राणा भीमदेवी थाटातील घोषणाही हवेतच विरली आहे. तेव्हापासूनच भाऊंच्या घोषणा, त्यांचे प्रत्यक्ष काम आणि वस्तुस्थिती यात फरक पडू लागला. भाऊ बोलतील, ते सत्यच असेल, असेल असे कोणीही मानत नाही. 

एका अल्पसंख्याक समाजाने स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पर्रीकर यांनी लक्ष घातल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने जागाही दिली. मात्र "स्मशानभूमीसाठी जागा देण्याचे काम आपल्यामुळेच झाले' हे भाऊंनी थेट बातम्या प्रसिद्ध करून दाखवून दिले. त्यावरही "काम कोणाचे आणि श्रेय कोण घेते' अशी जोरदार चर्चा झाली. इथपर्यंत ठीक होतं. पण ज्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील लोकांनी भाऊंना निवडून दिले, त्यांना दर्शन देणेही दुर्मिळ झाले आहे. इतकचे नव्हे, तर त्यांना पुणे कॅन्टोन्मेंटचा प्रथम नागरिक निवडण्यासाठी महिनाभर वेळच मिळाला नाही. कसाबसा वेळ काढला, त्यातही भाऊंनी बऱ्याच `घडामोडी' केल्याची चर्चा तेव्हा भाजपचे शहरातील वरिष्ठ नेते व "आरएसएस'च्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती. 

राज्याच्या इतर भागांतील कार्यक्रमांना भाऊ आवर्जून उपस्थिती लावतात. परंतु ज्यांनी निवडून दिले, त्यांच्यासाठी ना मंत्रालयात आवाज उठवितात, ना प्रत्यक्षात मतदारांना भेटून. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन ब्राह्मण समाजाला दमदाटी करण्यास मात्र ते विसरत नाहीत. शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांच्या मतदारसंघात खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्ड आहे. दिलीप कांबळेंच्या मतदारसंघाचे नावच पुणे कॅन्टोन्मेंट आहे. विजय काळे हे खडकी कॅन्टोन्मेंट भागातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देतात. एवढे करूनही "तुम्ही कामे सांगा, मी निधी देतो' असे बोलतात.

 
इकडे भाऊंना पुणे कॅन्टोन्मेंटवासीय आणि त्यांचे प्रश्न, याच्याशी काही देणेघेणे नसल्याचीच भावना आहे. साहजिकच काळे आणि कांबळेच्या कामाची तुलना नागरिक केल्याशिवाय राहत नाहीत. भाऊंचा "जनता दरबार' कधी होतो, तर कधी होत नाही. त्याविषयी नागरिकांमध्ये फारसे गांभीर्य राहिलेले नाही. 

कधी नव्हे, ते भाऊंनी कॅन्टोन्मेंटमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्याच दहा कोटी रूपयांविषयी (अद्याप काम सुरूच झाले नाही) भाऊ दीड वर्षांपासून बोलतात. त्याविषयी ते कधीच थकत नाहीत. या आणि अशा अनेक कारणांमुळे भाऊ जरा जास्तच चर्चेत येऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये "आमदार हरवले आहेत का,' असे फलक लागल्यास आश्चर्य वाटायला नको! 

संबंधित लेख