Did Shivsena avoided alliance with BJP In Nagar ? | Sarkarnama

नगर महापालिका : छिंदम प्रकरणामुळे शिवसेनेने भाजपशी युती टाळली ?

मुरलीधर कराळे
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

आता युती होऊ नये म्हणूनच देव पाण्यात घालण्याची वेळ या शिवसेना उमेदवारांवर येणार आहे.

नगर : छिंदम प्रकरणामुळे शिवसेनेने  भाजपशी युती टाळली काय अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे . 

 शिवसेना व भाजपची युती झाली तरीही दोन्ही पक्षांना विशेष फायदा होणार नाही. कारण दोन्ही पक्षांमध्ये मागील तीन-चार वर्षांपासून कायम एकमेकांवर जाळ फेकण्याचे काम सुरू आहे. त्यात नुकतेच झालेल्या छिंदम प्रकरणामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांवर तुटून पडत आहेत. अद्यापही ही आग विझलेली नाही.

त्यामुळे युती झाल्यास एकमेकांचे पाय ओढण्याने इतर पक्षातील उमेदवाराचाच फायदा होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार जाहीर करताना जुन्या - नव्यांचा मेळ घालत उमेदवार दिले असले, तरी बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. सध्या सत्तेत वरचष्मा असलेल्या शिवसेनेने जुन्या नगरसेवकांची ताकद आणखी बळकट करीत काही नवीन चेहरे दिले आहेत. परंतु जुन्या चेहऱ्यांवरच शिवसेनेची भिस्त दिसून येत आहे.

महापाैर सुरेखा कदम यांना प्रभाग बारामधून उमेदवारी दिली आहे. तर चंद्रशेखर बोराटे, दत्तात्रेय कावरे, सुभाष लोंढे, भगवान फुलसाैंदर, सुवर्णा जाधव, दिलीप सातपुते, दिपाली बारस्कर, योगिराज गाडे आदी दिग्गजांना पुन्हा संधी देत राठोड यांनी जुन्यांना खुष ठेवले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर एक यादी जाहीर केली. त्यामध्ये जुन्यांनाच संधी देण्यात आली. आज दुसरी यादी जाहीर करून नवीन काही मंडळींना उमेदवारी दिल्याचे त्यातून जाहीर केले आहे.

गेल्या महिनाभरापासून शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यात भावी उमेदवार पळवापळवी सुरू आहे. अद्यापही ती सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने नाराज कार्यकर्त्यांना कसे सांभाळणार, याकडे लक्ष लागले आहे. उमेदवारी न मिळालेले काही कार्यकर्ते इतर पक्षात जातील, त्यामुळे त्यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राज्य पातळीवर भाजप व शिवसेनेची युती झाली, तर काही जणांची उमेदवारी रद्द करण्याची वेळ येवू शकते. असे असताना उमेदवार जाहीर करून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. आता युती झाली, तरीही आमचे उमेदवार बदलणार नाही.

आम्ही आधी उमेदवार जाहीर केले असल्याने त्यात कोणताही बदल होणार नाही, मात्र वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी आवश्य करू, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता युती होऊ नये म्हणूनच देव पाण्यात घालण्याची वेळ या उमेदवारांवर येणार आहे.

संबंधित लेख