dhule`s election under leadership of Mahajan : Danave | Sarkarnama

गिरीश महाजनांच्या नेतृत्वातच धुळे महापालिका निवडणूक : दानवेंचा निर्वाळा 

निखिल सूर्यवंशी
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

धुळे : येथील महापालिकेची निवडणूक वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वातच लढविली जाईल, असा निर्वाळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी सायंकाळी साडेसातनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. यातून पक्षांतर्गत आमदार अनिल गोटे यांच्याकडून निर्माण करण्यात आलेल्या नेतृत्वाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न श्री. दानवे यांनी केला. 
 

धुळे : येथील महापालिकेची निवडणूक वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वातच लढविली जाईल, असा निर्वाळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी सायंकाळी साडेसातनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. यातून पक्षांतर्गत आमदार अनिल गोटे यांच्याकडून निर्माण करण्यात आलेल्या नेतृत्वाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न श्री. दानवे यांनी केला. 
 
मंत्री डॉ. भामरे, मंत्री महाजन, मंत्री रावल, आमदार स्मिता वाघ, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असून, 48 मतदारसंघांत माझ्यासह संघटनमंत्री विजय पुराणिक यांचा दौरा सुरू आहे, असे श्री. दानवे यांनी सांगितले. 

महाजनांच्या नेतृत्वात निवडणूक 
विविध प्रश्‍नांवर श्री. दानवे म्हणाले, की महापालिका निवडणुकीची सूत्रे संपूर्णपणे प्रभारी म्हणून नियुक्ती झालेले मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्यांच्यासह मंत्री भामरे, मंत्री रावल यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक होईल.

उमेदवार जाहीर केलेले नाहीत 

निवडणुकीची सूत्रे या तिन्ही मंत्र्यांकडे सोपविली असली तरी भाजपची निवडणूक लढविण्याची एक प्रक्रिया असून उमेदवार निश्‍चितीचा निर्णय पक्षाचे राज्य पार्लमेंटरी बोर्डच घेईल. यात उमेदवार कोण असतील हे जिल्ह्याचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. त्याची मान्यता राज्य पार्लमेंटरी बोर्डकडून घेतली जाईल. या बोर्डमध्ये अनेक आमदारांचा समावेश असतो. उमेदवार निवडीची संपूर्ण प्रक्रिया पक्ष सांगेल त्याप्रमाणेच होईल. इच्छुकांचे अर्ज मागविणे, मुलाखत घेणे, यादी करणे व ती राज्य पार्लमेंटरी बोर्डकडे सादर करण्याची प्रक्रिया जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाकडून केली जाईल. यात कुणीही मी उमेदवार ठरवू शकतो, असे म्हणेल, त्याला पक्षीयदृष्ट्या महत्त्व नाही. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत, असे श्री. दानवे यांनी नमूद केले. 

भाजप स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेते. लोकप्रतिनिधीपेक्षाही पार्लमेंटरी बोर्डला विचारून पक्षाची भूमिका ठरते. ते लक्षात घेता धुळे महापालिकेवर पक्षाचा ध्वज फडकण्यास कुठलीही अडचण येणार नाही, असा विश्‍वास आहे. भाजपने पक्षाचे आमदार असलेल्या ठिकाणी पालक म्हणून त्यांना नियुक्त केले आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आहे तो मतदारसंघ जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करायचे, शिवाय त्यांना लगतचा आणखी एक मतदारसंघ निवडून आणण्याची जबाबदारी दिली गेली आहे, असे श्री. दानवे म्हणाले. 

उत्तर देणे गरजेचे नाही 
आमदार गोटे हे परजिल्ह्यातील पार्सल (मंत्री महाजन) धुळ्यात चालणार नाही, कुठे नेऊन ठेवलाय भाजप माझा, पक्षात गुंड, गुन्हेगारांना प्रवेश दिला जात असेल तर विजय कसा मिळेल आदी विविध प्रश्‍न उपस्थित करीत पक्षाची कोंडी करत असल्याच्या मुद्यांकडे पत्रकारांनी श्री. दानवे यांचे लक्ष वेधले. मात्र, प्रत्येक अशा प्रश्‍नाला उत्तर दिलेच पाहिजे, भूमिका मांडलीच पाहिजे असे गरजेचे नाही, असे सांगत श्री. दानवे यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच जिल्हा किंवा राज्य पार्लमेंटरी बोर्डमध्ये आमदार गोटे यांचा समावेश आहे किंवा नाही तेही श्री. दानवे स्पष्ट करू शकले नाहीत. स्व- पक्षाच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या आमदार गोटे यांच्यावर काय कारवाई करायची ते पक्ष ठरवेल, असेही ते एका प्रश्‍नावर म्हणाले. महापालिका निवडणूक ही आमदार, खासदारांची नाही तर पक्षाची आहे. त्यासाठी एकदिलाने सर्वांनी काम करावे, असे आवाहन असल्याचे श्री. दानवे म्हणाले. 

"एबी फॉर्म'चा अधिकार दानवेंकडे 
निवडणुकीतील "एबी फॉर्म'चा अधिकार प्रदेशाध्यक्षांकडे असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले. अनेक महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर युतीचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवसेनेला असले तरी स्थानिक नेतृत्व त्याविषयी निर्णय घेईल, असे श्री. दानवे म्हणाले. भाजपचे उमेदवार इच्छुकांची क्षमता तपासून पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शहर- जिल्हाध्यक्ष मुखियाच 
भाजपमध्ये काही गुंड, गुन्हेगारांना प्रवेश दिला गेल्याचा मूळ आक्षेप आमदार गोटे यांनी घेतला आहे. त्यावर भूमिका विचारली असता श्री. दानवे म्हणाले, की हा शहर- जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांच्याशी संबंधित प्रश्‍न आहे. असे नाही, की जिल्हाध्यक्ष या सर्व प्रक्रियेचा मुख्य भाग आहे. निवडणूक प्रमुखही ते ठरवतो. प्रभारीपदाची नियुक्ती केली म्हणजे शहर- जिल्हाध्यक्षाला महत्त्व नाही, असे नाही. तो पक्षाचा मुखियाच असतो. 

"वाल्या'चे जत्थे भाजपात अन्‌ हशा... 
पक्ष विस्तार महत्त्वाचा आहे. त्यासाठी पक्ष प्रवेश केले जातात. यात "वाल्या'चा एखाद- दुसरा "वाल्मीकी' झाला तर ठीक. धुळ्यात "वाल्या'चे जत्थेच्या जत्थे भाजपमध्ये येत असल्याचा प्रश्‍न एका पत्रकाराने उपस्थित करताच उपस्थित मान्यवरांसह सर्वांमध्ये हशा पिकला. 

संबंधित लेख