dhule-municipal-corporation-election-anil-gote-bjp | Sarkarnama

बंडखोरीसाठी मला भाग पाडू नका; आमदार अनिल गोटेंचा भाजपला इशारा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

महापालिकेच्या डिसेंबरमधील निवडणुकीत वेगळी चूल मांडणार नसून, मी भाजपबरोबरच राहणार आहे. कुठल्याही स्थितीत गुंडापुंडांना उमेदवारी देऊ देणार नाही. पक्षातील नेत्यांनी उमेदवार निवडीबाबत चुकीचा निर्णय घेऊ नये. याप्रश्‍नी बंडखोरीसाठी मला भाग पाडू नका, असा सज्जड इशारा आमदार अनिल गोटे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उद्देशून आज येथे दिला.

धुळे : महापालिकेच्या डिसेंबरमधील निवडणुकीत वेगळी चूल मांडणार नसून, मी भाजपबरोबरच राहणार आहे. कुठल्याही स्थितीत गुंडापुंडांना उमेदवारी देऊ देणार नाही. पक्षातील नेत्यांनी उमेदवार निवडीबाबत चुकीचा निर्णय घेऊ नये. याप्रश्‍नी बंडखोरीसाठी मला भाग पाडू नका, असा सज्जड इशारा आमदार अनिल गोटे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उद्देशून आज येथे दिला.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथील महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहेत. हा निर्णय आमदार गोटे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांनी सोशल मीडियावर दानवे यांना पत्र लिहून दोन ऑक्‍टोबरला पांझरा नदीकिनारी होणाऱ्या मेळाव्यात भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर समर्थकांच्या गर्दीत दुपारी मेळावा झाला. 

स्वकीयांवर टीकास्त्र आमदार गोटे हे इतर काही नेते व संबंधित मंत्र्यांना उद्देशून म्हणाले, की केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना तुम्हाला धुळे शहरातून उमेदवार मिळत नाहीत. कारण तुमची नियत साफ नाही. माझ्याकडे आतापर्यंत 317 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पैकी 262 उमेदवार हे पदवीधर आहेत. पदवीधर आणि कोऱ्या पाट्यांना, गरिबातल्या गरीब प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देईल. भाजपतर्फे 74 जागा लढवेल. निवडणूक कशी लढवायची हे बाहेरच्यांनी मला शिकवू नये. महापालिका निवडणुकीबाबत चुकीचा निर्णय झाल्यास शांत बसणार नाही. मी बंड केले, तर तुम्हाला थंड केल्याशिवाय राहणार नाही, असे सूचक विधानही गोटे यांनी केले. 

ते म्हणाले, की महापालिकेत भाजपची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही. शहरात अनेक विकासकामे केलीत. धुळेकरांसह बालकांची चौपाटी विरोधकांनी उद्‌ध्वस्त केली. तरीही नव्याने सहा चौपाट्या निर्माण करणार आहे. तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत क्‍लासेस सुरू करणार आहे. रस्त्यांसह मोफत घरे, सातबारा उतारा देणार आहे. 
 

संबंधित लेख