dhule-heena-gavit-cm-narendra-fadanvis | Sarkarnama

डॉ. हीना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

निखिल सूर्यवंशी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (5 आॅगस्ट) 
मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून जो हल्ल्याचा प्रसंग बेतला. तो त्यांनी सोमवारी लोकसभेच्या सभागृहात मांडला.

धुळे : भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (5 आॅगस्ट) 
मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून जो हल्ल्याचा प्रसंग बेतला. तो त्यांनी सोमवारी लोकसभेच्या सभागृहात मांडला.

आदिवासी खासदार महिलेचे रक्षण पोलिस करू शकत नसतील तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्‍न डॉ. गावित यांनी उपस्थित केला. राज्यात गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निष्क्रिय आहेत, असा अर्थ विविध पातळीवरून काढला जात आहे. यातून खासदार डॉ. गावित यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिल्याचे म्हटले जाते. 

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि खासदार डॉ. गावित यांच्या लोकसभेतील भूमिकेनंतर निर्माण होत असलेल्या वादाला राजकीय वळण लाभत आहे. तो विविध पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. 

पोलिसांच्या निष्क्रियतेवर टिका 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही आंदोलकांकडून कारची तोडफोड झाली. कार उलटविण्याचा प्रयत्न झाला. कारमधून उतरले नसते तर माझा मृत्यूही झाला असता. हल्ला झाला त्यावेळी केवळ चार पोलिस उपस्थित होते. त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचे काम केले नाही. ते केवळ बघत राहिले. पंधरा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. परंतु, त्यांना दोन तासात सोडून देण्यात आले. हल्लेखोराचा हारतुरे घालून सत्कार झाला. मी आदिवासी खासदार असून माझे रक्षण पोलिस करू शकत नसतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्‍न खासदार डॉ. गावित यांनी लोकसभेत उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांकडून इलाज का नाही? 
शहरासह जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेबाबत वर्षभरापासून गंभीर तक्रारी सुरू आहेत. विविध राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलने, मोर्चातून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. काही लोकप्रतिनिधींनी धुळेकरांसह इतर संघटनांचा हा आक्रोश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला. मात्र, पोलिसांच्या निष्क्रियतेविषयी खासदार डॉ. गावित यांना लोकसभेत आवाज उठवावा लागला. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. असे असताना त्यांना याप्रश्‍नी वेळेत इलाज का करता आला नाही, असा प्रश्‍न अनेकांना सतावतो आहे. 

पोलिस यंत्रणा बेफिकीर? 
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रविवारी आरक्षणप्रश्‍नी क्रांती मोर्चाचे कुटुंबासह शेकडो आंदोलक ठिय्या मांडून होते. तरीही सुटीच्या दिवशी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ठेवण्यात आली. असो. मग पोलिस बंदोबस्ताबाबत नेमके काय नियोजन झाले? शनिवारी आढावा घेतला गेला का? तो कुणी घेतला? बंदोबस्तासाठी कुठल्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली? तसे असेल तर हल्ल्याची घटना घडलीच कशी, असे गंभीर प्रश्‍न खासदार डॉ. गावित यांच्या लोकसभेतील भूमिकेनंतर उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे. 

संबंधित लेख