धुळे महापालिका निवडणूक : भाजप 'फोर्टी प्लस',  'एमआयएम'ला चार जागा, आघाडीचा धुव्वा 

महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. 'एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने 'मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप असलेल्या उमेदवारांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे.
धुळे महापालिका निवडणूक : भाजप 'फोर्टी प्लस',  'एमआयएम'ला चार जागा, आघाडीचा धुव्वा 

धुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. 'एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने 'मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप असलेल्या उमेदवारांनी जल्लोष करण्यास प्रारंभ केला आहे. निवडणूक यंत्रणेने आतापर्यंत एकही अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही हे विशेष. दरम्यान, काही विजयी उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी संभाव्य वाद टाळण्यासाठी सौम्य लाठीमार केला. 

काँग्रेस आघाडीला झटका
महापालिकेत बारा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तिला सुरुंग लावण्यासाठी भाजपने या निवडणुकीत 'फिफ्टी प्लस'चा नारा दिला. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वावरून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. यात भाजपला नमोहरम करण्याचा विडा उचलत बंडखोर आमदार गोटे यांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षातर्फे 59 उमेदवार रिंगणात उतरविले. 

या नेत्यांमधील वादात आपला लाभ होईल, अशी अटकळ काँग्रेस आघाडीचे नेते माजीमंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील यांना होती. ती फोल ठरताना दिसते आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही गुंड उमेदवारांना प्रवेश दिला, असा प्रचाराचा प्रमुख मुद्या करत आमदार गोटे यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने ही निवडणूक राज्यात गाजली. आमदार गोटे यांना पुरून उरत तीन मंत्र्यांनी गोटे व काँग्रेस आघाडीला चांगलाच झटका दिल्याचे चित्र समोर येत आहे. 


विजयाची स्थिती

महापालिका निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या स्थितीनुसार भाजपने सरासरी 42 जागांवरील विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 6, 7, 9, 10, 11, 14, 16, 17, 18 मध्ये भाजपचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करीत आहेत. प्रभाग 15 मध्ये तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. उर्वरित एका जागेवर बसपाचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग 3 आणि 13 मध्ये 'एमआयएम'च्या अनुक्रमे तीन व एका उमेदवाराने विजय संपादन केला. तेथे काँग्रेस आघाडीला झटका बसला. 

प्रभाग पाचमध्ये लोकसंग्राम पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार हेमा अनिल गोटे, राष्ट्रवादीचे कमलेश देवरे, भाजपचे भगवान गवळी, कृपेश नांद्रे विजयाकडे वाटचाल करत आहेत. प्रभाग आठमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर कल्पना महाले व आघाडीच्या अन्य तीन उमेदवारांनी विजय मिळविला आहे. महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात समाजवादी पक्षाच्या बिनविरोध एका महिला उमेदवारासह 355 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी रविवारी सरासरी 59.64 टक्के मतदान झाले. भाजपचे 62, शिवसेनेचे 50, काँग्रेसचे 21, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, लोकसंग्राम पक्षाचे 59, 'एमआयएम'चे 12, 'रासप'चे 12, समाजवादी पक्षाचे 12, मनसेचा एक उमेदवार आणि इतर अपक्ष रिंगणात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com