dhondage on shetti and sadabhau | Sarkarnama

शेट्टी-सदाभाऊंचे भांडण म्हणजे दीड जिल्ह्याचे राजकारण ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

शेतकऱ्यांना शेती सोडून पळवून लावून कार्पोरेट फार्मिंग पुढे आणण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. महागाईचा निर्देशांक कमी ठेवण्यासाठी शेतीमालाचे दर कमी करत त्यांनी शेतकऱ्यांना बरबाद केले आहे, असा आरोप किसान मंचचे निमंत्रक, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. दरम्यान, शेट्टी आणि सदाभाऊंचे भांडण म्हणजे दीड जिल्ह्याचे राजकारण असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. 

सातारा : शेतकऱ्यांना शेती सोडून पळवून लावून कार्पोरेट फार्मिंग पुढे आणण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. महागाईचा निर्देशांक कमी ठेवण्यासाठी शेतीमालाचे दर कमी करत त्यांनी शेतकऱ्यांना बरबाद केले आहे, असा आरोप किसान मंचचे निमंत्रक, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. दरम्यान, शेट्टी आणि सदाभाऊंचे भांडण म्हणजे दीड जिल्ह्याचे राजकारण असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. 

किसान मंचच्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानातंर्गत शेतकरी मेळाव्यासाठी श्री. धोंडगे आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची सर्व माहिती सरकारकडे असताना कर्जमाफीचे अर्ज कशासाठी, असा प्रश्‍न करून श्री. धोंडगे म्हणाले, शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत 30 जिल्ह्यातून 55 दिवसांचे अभियान आम्ही राबवत आहोत. या अभियानाची नाशिकला सांगता होणार आहे. या अभियानातून संपूर्ण कर्जमुक्तता, शेतीमाल भाव ठरविणाऱ्या समितीला घटनात्मक अधिकार द्यावे, शेतकऱ्यांना तारण जमीनीच्या मुल्ल्यांकनात कर्ज उपलब्ध करावे, पेरणी ते काढणीपर्यंतची कामे मनरेगातंर्गत करावीत, तरूणांना काम मिळेपर्यंत मानधन मिळावे, हे मुद्दे मान्य करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपच्या दोन्ही शासनांच्या धोरणांमुळे शेतकरी, शेतमजूरांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

धोंडगे म्हणाले, सभागृहात पीएम आणि सीएम दोघेही हातवारे करून आपले मत मांडतात. हे घटनेत बसत नसले तरी कबड्डी खेळल्यासारखे बोलतात. मोदी तर मैं तो फकिर हूँ..असे भाषणात सांगतात पण मोदीजी राजा फकीर कसा असू शकतो.. तुम्ही फकिर असाल पण आम्ही पोरबाळं वाले आहोत. राज्यकर्त्यांना हे शोभणारे नाही. शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकले पाहिजे. 

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यातील वादावर श्री. धोंडगे म्हणाले, त्यांचे भांडण दीड जिल्ह्यापुरते मर्यादित असून संघटना काढून प्रश्‍न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण होईल असे त्यांनी काहीतरी करावे. 

संबंधित लेख