बीडमध्ये कागदावरचे गणित जुळणार की वेगळी समीकरणे प्रत्यक्षात येणार

बीडमध्ये कागदावरचे गणित जुळणार की वेगळी समीकरणे प्रत्यक्षात येणार

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्हीकडून मतदारांवर "आश्‍वासनां'चा वर्षाव आहे. आता रात्र वैऱ्याची असून यादीत असलेला मतदानाचा आकडा कायम टिकविण्याचे राष्ट्रवादीसमोर तर आपल्याकडील आकड्यात दोनशेंनी वाढ करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. त्यावरच भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अशोक जगदाळे यांचे भवितव्य ठरणार आहे. 

लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणुक आगामी सार्वत्रिक निवडणुकां अगोदर होणारी शेवटची निवडणुक आहे. त्यामुळे या निकालावर तीनही जिल्ह्यातील राजकारणाची भविष्यातील समिकरणे ठरणार आहेत. त्यामुळे केवळ नेत्यांचीच प्रतिष्ठा नाही तर पक्षांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तीन जिल्ह्यांच्या या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितींच्या सभापतींना मतदानाचा अधिकार आहे. सहाजिकच विजयासाठी उमेदवाराला पाचशे मतांचा पल्ला पार करायचा आहे. 

मतदान यादीवर नजर टाकल्यानंतर राष्ट्‍ररवादीच्या चिन्हावर विजयी झालेल्या मतदारांची संख्या, कॉंग्रेस आणि पक्षासोबत असलेल्या काकू - नाना आघाडीसारख्यांची काही मते साडेपाचशेच्या पुढे सहज जात असल्याचा राष्ट्रवादीला विश्वास आहे. त्यातच शिवसेनेने अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने व एमआयएमची मते भाजपला पडणार नसल्याचे अंदाज राष्ट्रवादी गोटात बांधले जात असून विजयाचा गुलाल आजपासूनच खरेदी करण्याची तयारी सुरु आहे. 

मात्र, पक्षातील बेदिली, नेतृत्वाचा सुप्त आणि उघड संघर्ष आणि गरजेपुरती सोबत घेतलेली कॉंग्रेस या राष्ट्रवादीसाठी उण्या बाजू आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. निवडणुक खर्चाच्या बाबतीत सक्षम उमेदवार हा राष्ट्रवादीचा एकमेव प्लसपॉईंट असला तरी धसांनीही "हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले आहे. भाजपच्या चिन्हावर विजयी झालेल्या मतदारांची संख्या तीनशेच्या घरात असली तरी सत्तेला मुंगळे लागलेले असतात या उक्तीप्रमाणे भाजपनेही अनेकांना गळाला लावल्याची चर्चा आहे. 

भाजपमधील "धस नको' असणाऱ्यांना राष्ट्रवादी गळ घालत आहे तर राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा मुद्दा उचलून या पक्षातील काही गटांना हाताळण्यात भाजप आणि खास करुन धस यांना यश आल्याची माहिती आहे. उस्मानाबादमध्ये राजकारण करताना अशोक जगदाळेंकडून दुखावलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी नेत्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. तर, भाजपचे सर्वाधिक मतदान लातूर जिल्ह्यात असल्याने संभाजी पाटील निलंगेकरांची भूमिका भाजपसाठी महत्वाची आहे. 

पंकजा मुंडे व निलंगेकर यांच्यातील राजकीय दुहीचा काही फायदा उठविता येतो का, यावर राष्ट्रवादी नजर ठेवून आहे. मात्र, संभाजीराव हे मुख्यमंत्र्यांचे खासम खास आणि ही जागा मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाची असल्याने भाजप निर्धास्त आहे. दरम्यान, मतदान सकाळी असल्याने सहलीवर गेलेले दोन्हीकडील मतदार परतीच्या प्रवासात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com