dhanjay munde | Sarkarnama

रेल्वेप्रश्‍नासह मुंबईच्या अन्य समस्यांसाठी विशेष अधिवेशन घ्या - धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता आपल्या सर्वांकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती देखील राज्यपालांना करण्यात आली आहे. 

बीड : मुंबईच्या परळ-एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील मध्य, पश्‍चिम, हर्बर या तीनही उपनगरीय रेल्वे सेवांचा वापर मुंबईतील व राज्यातील सुमारे एक कोटी नागरिक दर दिवशी करत असतात. या उपनगरीय रेल्वे सेवेच्या अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकांचा विस्तार, मुलभुत सोई सुविधांमध्ये वाढ करणे, पर्याप्त प्रमाणात फेऱ्या वाढवण्यापासून ते प्रवाशांच्या व विशेषत्वाने महिला प्रवाशांच्या सुरक्षीततेच्या अनेक गंभीर समस्या आहेत. रेल्वेसह मुंबईतील जनतेच्या जीवीताशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी त्यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी विधान परिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांकडे एका निवदेनाद्वारे केली आहे. 

दर दिवशी निव्वळ गर्दी व अपघातांमुळे आठ ते दहा नागरिक मृत्युमुखी पडतात. वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र शासन व रेल्वे प्रशासनाकडून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे संदर्भातील मागण्यांना प्रतिसाद मिळत नाही. पर्यायाने कोट्यवधी मुंबईकरांना रोज जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो, प्रसंगी प्राणही गमवावे लागातात याकडे धनंजय मुंडे यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे. 

राज्यातील जनतेच्या जिवीताची हमी घेणे हे आपले एक प्रमुख घटनात्मक कर्तव्य आहे. कोट्यवधी जनतेचा जीव धोक्‍यात असतांना केंद्र शासन व रेल्वे प्रशासनाच्या प्रतिसादाची वाट पाहत स्वस्थ बसणे या राज्यातील अकरा कोटी जनतेने आपल्या सर्वांवर टाकलेल्या विश्वासाचा घात ठरेल. त्यामुळे मुंबईसह राज्यातील कोट्यावधी जनतेच्या जिवीतासाठी व उपजिवीकेसाठी प्राणवाहिनी असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्व समस्या बाबत सर्वंकषचर्चा करणे, त्यासाठीच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करुन ठोस शिफारशी करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीची बाब म्हणुन येत्या 15 दिवसांच्या आत बोलावण्यात यावे अशी मागणी मुंडे यांनी या निवेदनात केली आहे. महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता आपल्या सर्वांकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती देखील राज्यपालांना करण्यात आली आहे. 

संबंधित लेख