dhanjay munde | Sarkarnama

मराठवाड्यात नव्या दोस्तीचा अध्याय

संजीव भागवत ः सरकारनामा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई : "शत्रूचा शत्रू , तो आपला मित्र'ही म्हण राजकारणामध्ये नेहमी अनुभवयास मिळते. अशीच एक नवी दोस्ती राज्याच्या राजकारणात गाजू लागली आहे. लातूर-बीडच नव्हे तर दिल्लीपासून ते अजमेरपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रंगलेल्या धनंजय मुंडे- संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या दोस्तीत नेमके दडलंय काय! अशी जोरदार चर्चा सध्या मराठवाड्यासह राज्याच्या राजकारणात रंगली आहे. 

मुंबई : "शत्रूचा शत्रू , तो आपला मित्र'ही म्हण राजकारणामध्ये नेहमी अनुभवयास मिळते. अशीच एक नवी दोस्ती राज्याच्या राजकारणात गाजू लागली आहे. लातूर-बीडच नव्हे तर दिल्लीपासून ते अजमेरपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रंगलेल्या धनंजय मुंडे- संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या दोस्तीत नेमके दडलंय काय! अशी जोरदार चर्चा सध्या मराठवाड्यासह राज्याच्या राजकारणात रंगली आहे. 

धनंजयराव आणि संभाजीराव हे दोघे मिळून अनेक ठिकाणी पर्यटनालाही जातात असे निकटवर्तीयांनी सांगितले. गेल्या आठवड्यामध्ये राजस्थानमधील जगप्रसिद्ध अजमेरच्या दर्शनाला दोघेजण गेले होते. अजमेरच्या दर्ग्यात केलेली मागणी पूर्ण होते अशी श्रद्धा असल्याने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ हे देखील दर्ग्याचे दर्शन घेऊन गेले होते. तर अशा या दर्ग्याचे दर्शन घेऊन दोघांनी काय मागितले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लातूर रेल्वेचा विषय सध्या गाजतोय. रेल्वे मंत्र्यांना दोघेही एका पाठोपाठ एक असे भेटले. बाहेर मात्र दोघेही एकत्रच होते अशी चर्चा आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि लातूर जिल्ह्यातील भाजपाचे मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी मराठवाड्यात मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला आहे. आपल्या शत्रूला चितपट करण्यासाठी त्याच्या विरोधातला माणूस कोणताही असो त्याला मित्र केले जाते आणि या मित्रत्वाच्या कहाण्या विशेषतः राजकारणात मोठ्या प्रमाणात रंगतात. पक्षापलिकडे मैत्री जपणारे अनेक नेते मराठी मुलखात होऊन गेले. त्यांच्या यारी दोस्तींची नेहमीच चर्चा होत आली. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, मनोहर जोशी-प्रमोद नवलकर, विलासराव देशमुख- गोपीनाथ मुंडे, आनंद दिघे-वसंत डावखरे अशा एक ना अनेक जोड्यांची नेहमीच चर्चा होत आली. हे नेते आपापल्या पक्षात मोठ्या पदावर असतानाही त्यांच्या मैत्रीवर कदापि परिणाम झाला नाही. 

विलासराव आणि मुंडे एकमेकांवर जशी स्तुतिसुमने उधळत तसेच फिरकीही घेत असतं. मोठ्या मनाने त्यांनी पक्षापलिकडे दोस्ती आयुष्यभर जपली. दोघेही परस्पर विरोधी पक्षात असल्यामुळे ही मैत्री अधिक बहरली असे राजकीय निरीक्षकांना वाटते. या पार्श्‍वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात नव्या जोड्याही प्रकाशात येत आहेत. त्यापैकी मुंडे-निलंगेकर यांची जोडी सध्या जोरदार चर्चेत आहे. या युवा नेत्यांची छुपी दोस्ती सध्या मराठवाड्यासह राज्यात गाजते आहे. 

मुंडे-निलंगेकर-पाटील हे दोघेही एकमेकांच्या विरोधी पक्षातील नेते असतानाही त्यांची दोस्ती पाहून अनेकांना या दोस्तीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. लातूर एक्‍स्प्रेस बीदरला वळविण्यापेक्षा ती परळी वैजनाथपर्यंत आणली जावी या मागणीसाठी एकामागे एक या दोस्तांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतल्याचे राज्यातील जनतेने पाहिले असले तरी त्यापूर्वी केवळ काही दिवस अगोदर अजमेर शरीफच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि अनेक ठिकाणी एकत्र फिरल्याच्या प्रवासाची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. मुंडे-निलंगेकर-पाटील यांनी अजमेर शरीफच्या समाधीवर एकत्रच डोके टेकवून मन्नत मागितली तर अनेक ठिकाणी गळ्यात गळा घालून फिरल्याची धक्‍कादायक माहितीही लातूरमधील एका विश्‍वसनीय सूत्राकडून देण्यात आली. 

विलासराव देशमुख यांचे राजकीय वारसदार अमित देशमुख यांच्याशी राजकीयस्तरावर संभाजीराव निलंगेकरांचे लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात सध्या संभाजीरावांचे पारडे महापालिका आणि जिल्हापरिषदेतील यशाने जड आहे. तर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेल्या आहेत. धनंजय मुंडे यांना गोपिनाथरावांचा राजकीय वारसदार बनायचे होते. पण, एैनवेळी पंकजाताईंना पुढे करण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. गोपिनाथरावांच्या आकस्मित निधनानंतर या बहीण-भावांतील राजकीय दुरावा कमी व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. प्रत्यक्षात दोघांतील अंतर आणि कटुता वाढतच गेली आहे. परळी नगर पालिकेतील यशानंतर धनंजयरावांनी बीड जिल्हापरिषदेचे युद्ध जवळपास जिंकले होते. पण, तहामध्ये बाजी मारली ती पंकजा मुंडे यांनी. अशाप्रकारे विलासराव आणि गोपिनाथरावांच्या वारसांना आव्हान देण्याच्या मुद्यावर ही नवी दोस्ती बहरते आहे. 

मागील दोन वर्षांत संभाजीरावांनी बरीच मदत केल्याने धनंजयराव जवळचे मित्र झाले असावेत असेही बोलले जात आहे. यापूर्वी महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांना केवळ आपल्या दोस्तीखातर संभाजी पाटील-निलंगेकर यांनी कधीही सहकार्याची भूमिका निभावली नाही. दुसरीकडे परळी आणि बीडच्या राजकारणात वाट्टेल तेव्हा आपल्या दोस्ताला पडद्याआडून संभाजी पाटील-निलंगेकरांनी मदत केल्याने ही दोस्ती तुटायची न्हाय, अशी भावना आणि बीड-लातूरकरांमध्ये निर्माण झाली आहे. तर या दोस्तीमागे दोघांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी मंत्रालयात एका मध्यस्थांने मोठी भूमिका पार पाडली असल्याचे बोलले जाते. हा मध्यस्थ सध्या शिवसेनेच्या एका तरुण मंत्र्याच्या जवळही असल्याने अशाच काही नव्या दोस्ती आर्थिक आणि राजकीय हितासाठी घडवून आणत असल्याचे बोलले जात आहे. अजमेरचा दौराही याच मध्यस्थाने आखला होता, मात्र त्याची कोणालाही कुणकूण लागू नये याची त्यांनी मोठी खबरदारी घेतली होती असेही सांगण्यात येत असले तरी या दोस्तीमुळे लातूर जिल्ह्यातील कॉंग्रेसमधेही उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 
 

संबंधित लेख