dhananjay munde speech in nagar election | Sarkarnama

नगरच्या विकासाची जबाबदारी घेतो : धनंजय मुंडे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

चार वर्षे झाली, कुठे गेला काळा पैसा?

नगर : भाजपने नगरसाठी तीन कोटी देण्याचे आश्वासन दिले, पण तीन कोटी देण्याची लायकी तरी आहे का? भाजप आणि शिवसेनेचे सरकार हे लबाडांचं सरकार आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सांगता मुंडे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी झाली. 

यावेळी मुंडे म्हणाले, या सरकारने गरीब जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली. दोन्हीही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काळा धन आणणार होते, चार वर्षे झाली, कुठे गेला काळा पैसा? जनतेच्या खात्यात १५ लाख देणार होते, आले का. जनतेने विश्वास ठेवू नये. विश्वासघात करून त्यांनी खिशाला चुना लावला. या सरकारने गॅस, रॉकेल, दाळ, पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून गोरगरीबांच्या खिशावर डल्ला मारला. नगरला तर सत्ता असूनही त्यांना विकास करता आला नाही. आगामी काळात त्यांना निवडून दिले, तर लोकशाही धोक्यात येईल, असा आरोप मुंडे यांनी केला.

राज्यातील नेते शरद पवार, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या सर्व उमेदवारांना निवडून दिले, तर शहराचा विकास होईल. शहर बदलण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे मुंडे म्हणाले. या वेळी आमदार संग्राम जगताप तसेच मान्यवरांची भाषणे झाली. 

संबंधित लेख