dhananjay mahadik will be minister | Sarkarnama

खा. धनंजय महाडीक भावी केंद्रीय मंत्री : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या व्यतिरिक्त ते कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. श्री. पवार कोल्हापुरात असतील तरच ते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसतात. 

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक हे लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री असतील, असे सांगून जिल्ह्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री. महाडीक यांच्या भाजप प्रवेशावरच शिक्कामोर्तब केले. 

येथील साडेतीन पीठापैकी एक असलेल्या अंबाबाई देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. या पालखीसाठी खासदार महाडीक यांनी पुढाकार घेतला होता. मंत्री पाटील यांच्या हस्ते ही पालखी देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी श्री. महाडीक यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. 

पाटील म्हणाले,"खासदार महाडीक हे नि:स्वार्थी आहेत, त्यांच्याकडे काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्यांचे कार्य आदर्श असून त्यामागे त्यांचे अविरत कष्ट आहे. या जोरावरच ते खासदार झाले. 2019 नंतर श्री. महाडीक हे आपल्या कार्याच्या जोरावर केंद्रीय मंत्री होतील.' 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना श्री. महाडीक यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर वादळात दिवा लावत विजयश्री मिळवली. पण काही दिवसांतच ते पक्षापासून दुरावले गेले. अलीकडे तर ते राष्ट्रवादीचेच खासदार ना असे म्हणण्याची वेळ आली आहे, इतकी त्यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे.

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ते पक्षाच्या विरोधातच राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट जिल्ह्यात झाली आहे. त्यांच्या या वर्तणुकीवरून ते 2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार असणार नाहीत अशी शक्‍यता आहे. अलीकडे तर त्यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढलेली आहे. त्यामुळे 2019 ला ते भाजपचे उमेदवार असतील म्हणूनच श्री. पाटील यांनीही त्यांना केंद्रीय मंत्री पदाचे "गाजर' आतापासूनच दाखविण्यास सुरवात केली असावी. श्री. महाडीक याचे एक चुलतभाऊ भाजापाचे आमदार आहेत, भावजय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. 

संबंधित लेख