Dhanajay Munde reminds government about Sikandar the great | Sarkarnama

'सिकंदर जब गया था दुनिया से, दोनो हात खाली थे...'- मुंडेंचा सरकारला इशारा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

 "याद रख सिकंदर के हौसले तो आली थे... जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे...' अशी अवस्था भाजप सरकारची झाली असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना केला.

मुंबई :  "याद रख सिकंदर के हौसले तो आली थे... जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे...' अशी अवस्था भाजप सरकारची झाली असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना केला.

भाजप सरकारच्या कारभारावर टीका करताना धनंजय मुंडे यांनी हा प्रसिद्ध शेर या वेळी सभागृहात ऐकून दाखवला. सिकंदर जग जिंकत गेला. भाजपही एक-एक राज्य जिंकत जात आहे. पण सिकंदरने एक चूक केली; जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था त्याने केली नाही. त्याप्रमाणेच भाजप जिंकत तर आहे; पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिकंदरचे झाले, ते तुमचे होऊ नये, असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला.

ऊर भरून यावा, अशी राज्यपालांनी अभिभाषणाची सुरुवात केली. या माझ्या महाराष्ट्रात राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना मराठीचा अपमान होत होता, त्याचे दु:ख भोगले. मराठीत अनुवाद का झाला नाही? अनुवादक कुणी आणायचा? पहिल्यांदा गलथान कारभारामुळे तावडेंना मराठी अनुवाद करावा लागला. मराठीचा अपमान पाहिला म्हणून खेद व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आजकाल सरकारमधील लोकांना खूप राग येऊ लागला आहे. साडेतीन वर्षे झालीत. राग वाढणार हे स्वाभाविकच आहे. कारण विरोधी पक्ष एकवटत असल्याचा तो राग आहे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

महापुरुषांचा अपमान
2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपने 'छत्रपतींचा आशीर्वाद! चलो चले मोदी के साथ', असा विश्‍वास जनतेला दिला गेला. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे आश्‍वासन आणि आता अभिभाषणामध्ये फक्त अश्‍वारूढ पुतळा असा उल्लेख आहे. सरकार पावलोपावली महापुरुषांचा अपमान करीत आहे. राज्यपाल मनाने बोलत नाहीत; तर सरकारने त्यांना बोलायला लावलेय, अशी संतप्त प्रतिक्रियाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
बाबासाहेबांच्या विचारानुसार राज्यकारभार; मात्र इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काय झाले? त्याचा साधा उल्लेखही नाही. महात्मा फुलेंच्या विचाराने सरकार चालल्याचे सांगितले जाते आहे आणि राज्यातील शाळा बंद करत आहात. हे सरकार महापुरुषांच्या विचाराने नाही, तर स्वत:च्या विचाराने चालते आहे; असा आरोपही त्यांनी केला.

मंत्र्यांचे कर्नाटक गीत
राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शहीद जवानांचा मुद्दा मांडण्यात आला आहे. सीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठी स्व. बाळासाहेबांच्या नावाने 'शहीद सन्मान' योजना काढली. एका बाजूला सत्ताधारी पक्षाचे सदस्य सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात; ज्यामुळे सभागृह बंद पडते याच्यासारखे दुर्देव नाही. कर्नाटक सीमेचा प्रश्‍न आजही प्रलंबित आहे. यावर बोलावं की नाही. दादांचं भिऊ वाटू लागलंय; पण मला बोलावं लागेल. सीमेवरील मराठी बांधव अखंड महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यातील एक मंत्री कर्नाटकात जाऊन कर्नाटक गीत गायले. मग राज्यपालांच्या अभिभाषणात त्या मराठी बांधवांचे प्रश्‍न का मांडता, असा संतप्त सवालही मुंडे यांनी या वेळी केला.

संबंधित लेख