dhairysheel mane about hatkanagale loksabha | Sarkarnama

हातकणंगले मतदारसंघात फौजदार आणि दरोडेखोरांची युती!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

उद्धव ठाकरे यांनी मोठे मन दाखवून मला प्रवेश दिला.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात फौजदार आणि दरोडेखोरांची युती झाली आहे. त्यामुळेच आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिवधनुष्य उचलले आहे. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित विजयी होण्याचा हातकणंगले लोकसभेचा इतिहास आहे. आज आम्ही विस्थापित आहोत, त्यामुळे आमचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आज 'सकाळ'ला भेट दिली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठे मन दाखवून मला प्रवेश दिला. एवढंच नव्हे तर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून उमेदवारीही निश्‍चित केली असल्याचे माने यांनी स्पष्ट केले. माने म्हणाले ,"घराणेशाही दाखवून मी येथे आलो नाही. जिल्हा परिषदेपर्यंत विजयी झालो आहे. बहुजनांचा चेहरा आता मतदारसंघाला पाहिजे आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनी यापूर्वी ज्यांना दरोडेखोर म्हणून स्वतः फौजदार झाले. तेच फौजदार आज दरोडेखोरांच्या जोडीला जाऊन बसले आहेत. कारखानदारांच्या विरोधात लढून आता त्यांच्या रांगेत जावून बसल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आजपर्यंत आम्ही प्रस्थापित होतो तेंव्हा विस्थापितांचा विजय झाला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा हा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही आता प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित आहोत. मतदारंसाघातील आमदारांची ताकद आमच्या पाठीशी आहे. तरुण आमच्या बरोबर आहेत. संघर्ष आहे. पण त्यातून यश नक्की मिळणार आहे.''

संबंधित लेख