devidas pingale and nashik bajar samiti | Sarkarnama

पिंगळेंच्या राजीनाम्यामुळे नव्या समीकरणांबद्दल उत्सुकता

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक : नाशिक बाजार समितीतील सत्तेसाठी गेले सहा महिने रचलेले विविध राजकीय इमले सातत्याने ढासळत राहिले. मात्र अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी वाऱ्याची बदलती दिशा पाहून पदाचा राजीनामा दिल्याने आता पिंगळे आऊट तर भाजप इन अशी स्थिती झाली आहे. यानिमित्ताने येत्या मंगळवारी चर्चेला येणाऱ्या अविश्‍वास ठरावाचे काय होते? याची उत्सुकता आहे. 

नाशिक : नाशिक बाजार समितीतील सत्तेसाठी गेले सहा महिने रचलेले विविध राजकीय इमले सातत्याने ढासळत राहिले. मात्र अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी वाऱ्याची बदलती दिशा पाहून पदाचा राजीनामा दिल्याने आता पिंगळे आऊट तर भाजप इन अशी स्थिती झाली आहे. यानिमित्ताने येत्या मंगळवारी चर्चेला येणाऱ्या अविश्‍वास ठरावाचे काय होते? याची उत्सुकता आहे. 

गेले सहा महिने राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुध्द भाजप, शिवसेनेतील राजकीय सत्ता संघर्षाचे केंद्र बनलेल्या नाशिक बाजार समितीमध्ये समितीचे अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी काल राजीनामा दिल्यानंतर येत्या बुधवारी चर्चेला येणाऱ्या अविश्‍वास ठरावाच्या राजकारणाला नाट्यमय वळण मिळाले. समितीतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह विधीच्या 57 लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासूनच त्याच्या प्रत्येक घडामोडीमागे सत्ताधारी पक्षाला प्राप्त झालेल्या राजकीय सत्तेचा वास येत होता. 

त्यातील हालचाली लपून राहिलेल्या नव्हत्या. अटक झाल्यानंतर पिंगळे यांनाजामीनासाठी आकाश पाताळ एक करावे लागले होते. तपास अधिकारी तपास पूर्ण झाल्याचा अहवाल देत नसल्याने जामीनाचा मार्ग मोकळा होत नव्हता. असे केव्हा घडू शकते हे सांगण्यासाठी राजकीय पंडीतांची गरज नसते. अखेर बाजार समितीच्या कामकाजात चार महिने लक्ष घालू नये या अटीवर पिंगळे यांना जामीन मंजुर झाला होता. पिंगळे बाजार समितीत परतल्यास त्याना हलवणे अशक्‍य होईल याची जाणीव झाल्याने गेले आठवडाभर अतिशय वेगाने हालचाली करीत पिंगळे यांच्या गटातील सदस्यांसह तेरा संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. येत्या बुधवारी त्यासाठी बैठक होणार आहे. 

दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत पिंगळे यांच्या पॅनेलला 23 पैकी 19 जागा मिळाल्या होत्या. मात्र पिंगळेंवर खटला दाखल झाल्यावर त्यांच्या गटातील चार संचालक भाजपमध्ये गेले होते. शिवसेनेचे शिवाजी चुंभळे, कॉंग्रेसचे संपत सकाळे एकत्र आल्यावर पिंगळेच्या विरोधातील संचालकांची संख्या तेरा झाली. यामध्ये पालकमंत्री गिरीष महाजन यांनाही विशेष रस असल्याने सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंगळे आऊट आणि भाजप इन होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आता पुन्हा पिंगळे काय डाव खेळतात हे महत्वाचे आहे. विरोधकांना शरण न जाता विरोधकांमधल्या सोयीच्या गटाला मदत करुन आपली राजकीय सोय ते करतात का याकडे अनेकांचे लक्ष आहे. 
 

संबंधित लेख