कर्जतच्या निकालानंतर माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासाठी धोक्याची घंटा?

शिवसेनेचे दोन नेते हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे साटम यांच्याऐवजी या नवीन चेहऱ्यांना तर आगामी विधानसभेत संधी मिळणार नाही ना, याची शंका व्यक्त होत आहे.
कर्जतच्या निकालानंतर माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासाठी धोक्याची घंटा?

कर्जत : भाजपचे नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्याचे राजकीय रंग बदलू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा पारंपरिक किल्ला उद्ध्वस्त केला. त्यांच्या या कामावर कर्जत तालुक्यातील खुद्द शिवसैनिकच फिदा असल्याची चर्चा आहे. या साऱ्या घडामोडींचा फटका माजी आमदार देवेंद्र साटम यांना बसण्याची शक्यता आहे. 

कर्जत -खालापूर विधानसभा मतदारसंघ हा तसा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र १९९९च्या विधानसभा हे चित्र पालटले. सेनेचे आमदार देवेंद्र साटम यांनी कर्जत- खालापूरमध्ये ,मोठ्या प्रमाणात कामे करूनही त्यांना पराभवाचा फटका बसला. मात्र २००४ च्या निवडणुकीत साटम यांनी वचपा काढत सुरेश लाड यांना चितपट केले. मात्र त्यानंतर २००९ पासून लाड यांनी सावरत कर्जतवर आपले प्रस्थ निर्माण केले. तसेच खोपोली, कर्जत, माथेरान नागरिषदांसह ग्रामीण भागात नातीगोती आणि काही कामाच्या जोरावर प्रस्थ निर्माण केले. २०१४ मध्येही लाड यांनी विरोधी शिवसेनेत फूट पाडून आपले वर्चस्व राखले.

त्यानंतर खोपोली वगळता माथेरान आणि आता कर्जत नगरपरिषद निवडणुकीत सुरेश लाड यांना अपयश आले. केवळ कर्जत नगरपरिषदेचा विचार करता, एकट्या सेनेला यश मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे नाराजी असूनही अखेरच्या क्षणी भाजप आणि सेना यांची युती झाली. मात्र कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या व्यूहरचनेत सर्वात मोठा वाटा होता रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचा. या दोघांनी नियोजन करून राष्ट्रवादी पक्षाला जोरदार हादरा दिला आहे.

पालकमंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात किमान तीन आमदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी कोणतीही राजकीय खेळी केली जाईल. कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत सेना- भाजप -आरपीआय युतीला यश आले असल्याने येथील सेना नेते पालकमंत्र्यांवर फिदा आहेत. त्यामुळे सेनेतील दोन बडे नेते भाजपात प्रवेशासाठी संपर्कात आहेत.

हे नेते भाजपामध्ये  दाखल झाल्यास गतवर्षी भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासाठी धोक्याची घंटा असू  शकते. भाजपामध्ये जुने आणि नवे असा कार्यकर्त्यांचा सामना सुरू आहे. जुन्या कार्यकर्त्यांना साटम  विचारत नाही, असा त्यांच्यावर आरोप होत असतो. साटम भाजपात येऊनही पक्षाला उभारणी मिळाली नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्याचा भाजपने विचार करावा, असाही हेका धरण्यात आला आहे. त्यामुळेच आगामी काळात या मतदारसंघांत घडामोडींची शक्यात वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com