devendra phadanvis cm and kshirsagar | Sarkarnama

फडणवीसांच्या गणपतीची क्षीरसागर भावंडांनी आरती केली आणि नवीच चर्चा सुरु झाली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार जयदत्त क्षीरसागर यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. विशेष म्हणजे प्रदेश पदाधिकारी यादीत पहिले नाव त्यांचे होते. मात्र, शुक्रवारी आमदार क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीची आरती केली. तसेच, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोनवरील गणपतीचे दर्शन घेतले. 

बीड : क्षीरसागर आणि मुंडे ही जिल्ह्यातील दोन मातब्बर घराणी. कुठल्या ना कुठल्या कारणांनी या दोन घराण्यांभोवतीच चर्चा होत असते. मागच्या दोन वर्षांपासून क्षीरसागरांच्या घरातील "काका - पुतण्या' वादामुळे हे घराणे चर्चेत आहे. आता नवी चर्चा सुरु झाली ती आमदार जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार याची. 

मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर एकमेव निवडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांची गोची करण्याचा प्रयत्न पक्षातीलच एक गट नेहमी करत आला. पुतणे संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारल्याने क्षीरसागरांची पक्षात गोची करण्याची चांगलीच संधी या गटाला मिळाली. दरम्यान, रस्तेकामांच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या भेटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चहापानाला घरी बोलविणे आणि ग्रामविकास पंकजा मुंडेंना कार्यक्रमांचे निमंत्रण यामुळे काही तरी वेगळे शिजतेय अशी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबत चर्चा व्हायची. 

पण, त्याच वेळी पक्षाच्या कार्यक्रमांत क्षीरसागर उपस्थित दिसायचे. त्यामुळे नेमके चाललेय का याचा अंदाज बांधणे राजकीय जाणकारांनाही कठीण झाले आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाने पुन्हा क्षीरसागरांना दुर्लक्षित केले. निकालानंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनीही भाजपच्या विजयाचा गुलाल खेळल्यानंतर पुन्हा क्षीरसागरांची पाऊले भाजपकडे असा अंदाज बांधला जात असतानाच राष्ट्रवादी पक्षाने महिनाभरापूर्वी आमदार जयदत्त क्षीरसागर यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. 

पण, शुक्रवारी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोचले. दोघांनीही फडणवीसांच्या गणपतीची आरती केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर जाऊन त्यांच्या गणपतीचेही दर्शन घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय संभ्रम निर्माण झाला असून क्षीरसागर यांच्या भूमिकेबद्दल चर्चाही सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या एका गटाकडून त्यांच्या पुतण्याचे नाव पुढे केले जात आहे. त्यामुळे क्षीरसागर भाजपमधून सेफ पर्याय तर शोधत नाहीत ना असा अंदाज आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख