डल्ला मारणारेच "हल्लाबोल' करत आहेत - देवेंद्र फडणवीस

डल्ला मारणारेच "हल्लाबोल' करत आहेत - देवेंद्र फडणवीस

बीड : शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याऐवजी स्वतःच्या तिजोरीचे सिंचन केले, कर्जमाफीतून स्वतःचे खिसेही भरले, राज्य विकासात मागे नेऊन ठेवले. पंधरा वर्षे डल्ला मारणारेच आता हल्लाबोल यात्रा काढतायेत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. तुमचे कारनामे जनतेसमोर आणून तुमचे हल्ले तुमच्यावरच उलटवू, आम्ही चुकत असलो तरी बेईमान नाही असा टोला देखील फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चावरून लगावला. 

बीड जिल्ह्यातील वडवणी येथे शुक्रवारी (ता. 1) झालेल्या भाजपच्या सरपंच मेळाव्यात बोलतांना फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला. श्री फडणवीस म्हणाले, विरोधकांच्या सत्ताकाळात कर्जमाफीतून अनेकांनी आपले खिसे भरले. मुंबईतही 200 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली, मुंबईत कोण शेतकरी आहे ते दाखवा. आम्ही मात्र खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहोत. विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे राज्य मागे गेल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मात्र, आता कृषी विकासाचा दर 12.50 टक्के झाला असून उद्योगात राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. देशात झालेल्या गुंतवणुकी पैकी निम्मी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही मागच्या काळात सिचंनाच्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतांनाच आम्ही चांगले काम करत असल्याचा दावा केला. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुषेश भरुन काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

फडणवीस, पंकजा यांनी गायले एकमेकांचे गोडवे 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप व राजकीय चर्चा नेहमीच केली जाते. पण आज या दोघांनीही एकमेकांचे गुणगान गात उपस्थितांना सुखद धक्का दिला. मुख्यमंत्र्यांनी पंकजांचा धाडसी नेत्या असा उल्लेख करून ग्रामविकासात राज्य पुढे जात असल्याचे म्हटले. जनतेतून थेट सरपंच निवडीचा त्यांचाच धाडसी निर्णय होता असेही फडणवीस सांगायला विसरले नाहीत. तर, माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नसल्याचे वातावरण मुद्दाम निर्माण केले जात असल्याचे सांगत आपण बाहेर राज्यात गेल्यानंतर कैसा चल रहा है असे प्रश्न मला विचारले जातात. मात्र, आपले आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध उत्तम आहेत. माझे त्यांच्याशी पटत नसते तर ग्रामविकास सारख्या मोठ्या खात्याच्या मंत्रीपदावर मी राहिले असते का? असा प्रतिप्रश्‍न पकंजा यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांच्या पीए कडून आमदारांची नावे कट 
दरम्यान, सरपंच मेळाव्याला जिल्ह्यातील भाजप आमदारांसह शिवसंग्रामचे विनायक मेटे हे देखील उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमात केवळ मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांची भाषणे आणि आर. टी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यानंतर इतर आमदारांची भाषणे झाली नाहीत. त्यावर आमदारांच्या भाषणांची यादी कट करण्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत भाषणांच्या नावांची यादी मुख्यमंत्र्यांचे पी. ए. संभाजी पवार यांनी कट केल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. काय, भांडायचेय ते त्यांच्याशी भांडा असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांना वेळेत जाता यावे यासाठी भाषणांना काट मारल्याचे त्यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com