devendra phadanvis cm | Sarkarnama

शिवसेना ही अशोक चव्हाणांची "बी ' टीम - देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नांदेडमध्ये सुद्धा महापालिका निवडणुकीनंतर अशीच अवस्था कॉंग्रेसची होणार असून अशोक चव्हाण यांनी मुंबईत फ्लॅट घेतले पण नांदेडमधील 50 हजारांहून अधिक लोक आजही बेघर आहेत. मुंबईत अशोक चव्हाणांचे फ्लॅट झाले पण नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. इतकी वर्ष अशोक चव्हाण सत्तेत होते, मग तरीही नांदेडचा विकास का झाला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

नांदेड : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नांदेडमधील शिवसेना ही "बी' टीम आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शिवसेनेने कॉंग्रेसला मदत केली. भिवंडी, मालेगावमध्येही असाच प्रकार घडला आहे. मात्र काहीही झाले तरी नांदेडमध्ये भाजपच जिंकणार असून कॉंग्रेसची पायाखालची वाळू सरकरली आहे, त्याचबरोबर शिवसेना देखील नांदेडमध्ये दोन आकडी संख्याही गाठू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नवा मोंढा मैदानावर सोमवारी (ता. नऊ) सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. तुषार राठोड, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुजितसिंह ठाकूर, सुरेश गायकवाड, महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भाजपचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. देशात त्याचबरोबर 18 राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. राज्यातही 16 पैकी 13 महापालिका भाजपच्या ताब्यात असून महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठीशी आहे. कॉंग्रेसचे सगळीकडेच पानीपत झाले असून लोणच्याइतकीदेखील ती उरली नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नांदेडमध्ये सुद्धा महापालिका निवडणुकीनंतर अशीच अवस्था कॉंग्रेसची होणार असून अशोक चव्हाण यांनी मुंबईत फ्लॅट घेतले पण नांदेडमधील 50 हजारांहून अधिक लोक आजही बेघर आहेत. मुंबईत अशोक चव्हाणांचे फ्लॅट झाले पण नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. इतकी वर्ष अशोक चव्हाण सत्तेत होते, मग तरीही नांदेडचा विकास का झाला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

नांदेडमध्ये गुरूतागद्दीच्या काळात कोट्यावधीचा निधी आला त्यातून झालेल्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचे कॅगच्या अहवालात स्पष्ट म्हटले असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण आणि कॉंग्रेसला सत्ता ही केवळ टक्केवारी खाण्यासाठी हवी आहे. राज्यातील नदी प्रदूषण केवळ दहा टक्के उद्योगामुळे होते, पण सांडपाण्यामुळे सर्वाधिक नदी प्रदूषित होत असते. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून नांदेडचे सांडपाणी शुद्धीकरण करून परळी औष्णिक केंद्राला नेण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

देशातल्या प्रत्येक गरिबाला त्यांच्या हक्काच घर मिळावं, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, गावासोबतच शहराचाही विकास झाला पाहिजे. शहरीकरण झपाट्याने वाढत असून त्याबाबत केवळ दोष देऊन भागणार नाही तर सोयीसुविधा देखील दिल्या पाहिजेत. शहरीकरण एक संधी आहे, असे मानून त्यातून स्मार्ट सिटी, अमृत तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नांदेडलाही या माध्यमातून निधी गेल्या तीन वर्षात देण्यात आला पण तो कुठे गेला हे मी सांगण्याची आवश्‍यकता नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन त्याचबरोबर कचऱ्यातून विद्युत निर्मिती तसेच पर्यटन आणि इतर विषय शहराच्या विकासासाठी आवश्‍यक असून सर्वसामान्यांना आता सेवेचा अधिकारसुद्धा सरकारने दिला आहे तसेच ई - गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना त्या कार्यालयात जाण्याची गरज नाही तुम्ही या सेवा मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा मिळवू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. 

आता नांदेडमध्ये देखील परिवर्तनाची संधी असून परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. नांदेडचा विकास करायचा असेल तर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आणावे लागेल आणि सबका साथ, सबका विकास असे ब्रिदवाक्‍य घेऊन आलेल्या भाजपला साथ द्यावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेदरम्यान शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सोलापूरच्या विद्यापीठाला सिद्धेश्वर विद्यापीठ नाव द्यावे त्याचबरोबर नांदेडला महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हे कार्यकर्ते अशोक चव्हाण यांनी पाठवल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांकडून चिखलीकरांचे कौतुक 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार प्रताप चिखलीकर यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, प्रतापराव चिखलीकरांचे काम हे प्रतापराव गुर्जरांसारखे आहे. आता मला नांदेडला येण्याची गरज नाही अशोकराव तुम्हाला आणि तुमच्या कॉंग्रेसला प्रतापरावच बास आहे. तुमचा किल्ला आता उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. नांदेड जिल्हा परिषदेत शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असताना देखील कॉंग्रेस आणि अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मॅनेज केले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील प्रतापरावांचे कौतुक करत प्रतापरावांचा प्रताप पाहून विरोधकांचा संताप होत आहे. भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आम्हाला जिल्ह्यातील माणूस हवा आहे, असे सांगून मुख्यमंत्री निश्‍चितच त्याकडे लक्ष देतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

संबंधित लेख