Devendra Fadnvis misses a program organised by Jankar | Sarkarnama

जानकरांच्या कार्यक्रमाला  मुख्यमंत्र्यांची दांडी! 

सरकारनामा
बुधवार, 31 मे 2017

मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार म्हणून मुंबईतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती, परंतु मुख्यमंत्री आलेच नाहीत. मुख्यमंत्री का आले नाही, याविषयी उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. 

मुंबई : मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात कॅबिनेट मंत्री महादेव जानकरांनी पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. 

जानकर यांनी अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

काही जणांचे म्हणणे होते की, जानकरांच्या वागणुकीमुळे मुख्यमंत्री नाराज आहेत.

चौंडी येथे झालेल्या अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात महिला व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना उपस्थितांनी धनगर समाजाला आरक्षण कधी देणार, असा सवाल उपस्थित करून मोठी पंचाईत केली . हीच वेळ आपल्यावर येईल की, या कारणामुळेच मुख्यमंत्री आले नसावेत असेही काहींची म्हणणे होते.

चौंडी येथे जलसंपदामंत्री राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे आपल्याच मंत्र्यांच्या कार्यक्रमाला न जाता जानकरांच्या कार्यक्रमाला जाणे योग्य होणार नसल्याने मुख्यमंत्री जानकरांच्या कार्यक्रमाला आले नसावेत असेही बोलले जात होते. 

संबंधित लेख