Devendra Fadnavis focusing on Pimpri ? | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या जोडीने पिंपरीवर लक्ष्य केंद्रित केले ? 

उत्तम कुटे
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

तसेच किमान मावळची जागा शिवसेनेकडून खेचून घेऊ, असा विश्वास शहर भाजपला आहे. दुसरीकडे युती झाली,तर दोन्ही जागा शिवसेनेला सोडाव्या लागणार आहेत.

पिंपरीः  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी शहराचा समावेश असलेल्या शिरूर व मावळ या लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच (ता.26) शहरात घेतला. त्यानंतर फडणवीस हे ही लोकसभा प्रचाराचा राज्यातील नारळ शनिवारी शहरातच जाहीर सभा घेऊन वाढविणार आहेत. त्यातून पुण्याच्या जोडीने भाजप व मुख्यमंत्र्यांनीही पिंपरीवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 ऐनवेळी युती न करण्याचा दगाफटका शिवसेनेकडून होऊ नये म्हणून ही काळजी भाजपकडून घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे युती झाली नाही,तर ऐनवेळीही तयारी असावी या हेतूने भाजपने या जोर बैठका सुरु केल्याचे समजते. 

याव्दारे पक्षश्रेष्ठींनी आपल्या भावनेला प्रतिसाद दिल्याचा दावा शहर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला. तसेच युती झाली,तरी किमान मावळ मागू, असेही तो म्हणाला.

यापूर्वीचे मुख्यमंत्र्यांचे बहुतांश शहर दौरे हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघात झाले होते. त्यामुळे दानवे यांचा मेळावा शहरातील पक्षाचे दुसरे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड विधासनभा मतदारसंघामध्ये झाला.

तर, मुख्यमंत्र्यांची सभा ही पिंपरी या शहरातील तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात होत आहे. तेथे शिवसेनेचा आमदार आहे. दरम्यान, या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. लोकसभेचे इच्छूक असलेले भाऊ (जगताप) व दादा (लांडगे) हे य़ानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आठवडभरातच पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा शनिवारी (ता.3) घेत असल्याने शहर भाजप आगामी लोकसभा निवडणुक तयारीच्या दृष्टीने थोडीशी निर्धास्त झाली आहे. मात्र, ही बाब शिवसेनेच्या दृष्टीने काहीशी चिंताग्रस्त करणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

युती शहरात पथ्यावर पडणारी नसल्याने ती होऊ नये अशीच शहर भाजपची भावना आहे. ती झाली नाही,तर शहराचा समावेश असलेल्या मावळ व शिरूर या दोन्ही जागांसाठी पक्षाकडे बलदंड उमेदवार आहेत. तसेच किमान मावळची जागा शिवसेनेकडून खेचून घेऊ, असा विश्वास शहर भाजपला आहे. दुसरीकडे युती झाली,तर दोन्ही जागा शिवसेनेला सोडाव्या लागणार आहेत.

  

संबंधित लेख