devendra fadavnis speech in sillod | Sarkarnama

जालन्यात कॉंग्रेसचे डिपॉझीट जप्त करा : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

जालन्यातील ड्रायपोर्टच्या कामाला सुरूवात झाली आहे.

औरंगाबादः कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पंधरा वर्षात जालना जिल्ह्याला साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. पण भाजप सरकारच्या चार वर्षातच जालन्यासाठी आम्ही तब्बल 1800 कोटी म्हणजे आघाडी सरकारपेक्षा तिप्पट निधी दिला आहे. याची पावती रावसाहेबांना निवडणुकीत द्या आणि कॉंग्रेसचे डिपॉझीट जप्त करा, असे आवाहन मुख्यमेंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचतानाच ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची असल्याचे सांगितले. मोदींच्या सगळ्या योजना या सबका साथ सबका विकास करणाऱ्या आहेत. या योजनांचा लाभ देतांना कुणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही सरसकट सगळ्यांनाच मोदी सरकारच्या योजनांचा लाभ मिळाल्याचा दावा फडणवीसांनी केला. 

जालन्यातील ड्रायपोर्टच्या कामाला सुरूवात झाली आहे. यातून पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. आयसीटी, समृध्दी महामार्गामुळे जालना आणि औरंगाबाद ही शहरं औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जातील असे सांगतानाच ज्या कॉंग्रेस सरकारने सिल्लोड शहरासाठी महत्वपुर्ण असलेल्या खडकपुर्णा पाणी पुरवठा योजनेची फाईल फेकून दिली होती, त्या प्रकल्पासाठी आम्ही शंभर कोटींचा निधी दिला. एवढेच नाही तर पहिल्यांदा मार्च महिन्यातच 72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  

संबंधित लेख