devendra fadanvise must resign nana patole | Sarkarnama

मराठ्यांची फसवणूक करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

नागपूर : गेली चारवर्षे मराठा समाजाची केवळ फसवणूक केल्याने राज्यात उद्रेक उडाला असून याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

नागपूर : गेली चारवर्षे मराठा समाजाची केवळ फसवणूक केल्याने राज्यात उद्रेक उडाला असून याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. या पेटलेल्या महाराष्ट्राच्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून पटोले म्हणाले,"" मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे राज्यात काढले. त्यावेळी कोणताही हिंसाचार झाला नाही. असा शांतताप्रिय समाज पंढरपूरच्या यात्रेत साप सोडून चेंगराचेंगरी करेल, या भीतीने मुख्यमंत्र्यांनी महापूजेला जाण्यास नकार दिला.

हा सर्व समाजाचाच नव्हे तर आतापर्यंत मराठा समाजाने काढलेल्या शांतताप्रिय मोर्चांना गालबोट लावण्याचा प्रकार आहे. यामुळे मराठा समाजात संताप निर्माण झाला त्याचा उद्रेक आता राज्यात दिसून येत आहे. यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याने फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्या काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूसाठी फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.'' 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी. या समितीने अभ्यास करून मिळणाऱ्या अहवालाला राज्यमंत्रिमंडळाच्या संमतीने केंद्राकडे पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राची परवानगी आवश्‍यक असल्याचे पटोले यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, सकल मराठा समाजचे नागपूरचे अध्यक्ष सतीश साळुंखे उपस्थित होते.

संबंधित लेख