मुनगंटीवारांना नेण्यासाठी फडणवीस विमान घेवून येतात तेंव्हा ... 

परिस्थितीची कल्पना देताच पाच मिनिटे दया असे सुमित म्हणाले अन लगेचच फडणवीस यांनी दूरध्वनी करून सांगितले आम्ही येतो,आमच्या विमानातून तुम्ही मुंबईला चला.
fadnvis-Mungantiwar.
fadnvis-Mungantiwar.

मुंबई:  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील साहचर्याची भूमिका काही प्रसंगात अचानक समोर येते.निवडणुकीच्या प्रचारयुध्दात एकमेकांना साह्य करूचा प्रसंग काल उशीरा घडला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना घेवून जाणाऱ्या विमानात नांदेड येथे तांत्रिक बिघाड झाल्याचे समजताच औरंगाबादहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लगोलग दाखल झाले अन मग दोघेही मुंबईला रवाना झाले. 

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज संपणार होता.त्यापूर्वी अधिकाधिक मतदारसंघात प्रचाराला जाण्याचे भाजपचे धोरण.विदर्भातील नागपूर मतदारसंघाची निवडणूक आटोपल्याने केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी आता अन्यत्र फिरण्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यांच्या सभांची प्रचाराचा किल्ला एकटयानेच लढवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदत होते आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील मतदारसंघांची जबाबदारी होती,तेही त्यातून मोकळे झाले असल्याने प्रचारात रुजू झाले आहेत.

मुंबईतून ते लोहा ,अहमदपूर येथे प्रचारासाठी निघाले.नितीन गडकरी लातुरात सभांसाठी पोहोचले.अमरावती या विदर्भातल्या मतदारसंघात जायचे होते.हवामान खराब असल्याचे निरोप सुरू झाले अन नांदेड येथे गडकरी प्रमुख पाहुणे असलेल्या एका सभेला त्यांच्याऐवजी मुनगंटीवार यांनी जावे असे ठरले. मुनगंटीवार त्यांच्या नियोजित सभा आटोपून चौथ्या सभेला हजर झाले. नांदेडात ही सभा होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा असतानाही सिडको भागातल्या भाजपच्या सभेला लक्षणीय उपस्थिती होती. 

मुनगंटीवार तेथे पोहोचले ,भाषण रंगले अन तेवढयात निरोप आला की विमानात तांत्रिक बिघाड आहे. उडडाण शक्‍य नाही.दुसऱ्या दिवशी मुंबईत सभा ठरलेल्या ,सकाळी पक्षाची आढावा बैठक. खराब हवामानामुळे विमान उडू शकणार नाही कळवण्यात आले. मग मुनगंटीवार यांचे सहायक संतोष आणि स्वीय सचिव अमोल जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांचे सचिव सुमित वानखेडे यांचा फोन आला .परिस्थितीची कल्पना देताच पाच मिनिटे दया असे सुमित म्हणाले अन लगेचच फडणवीस यांनी दूरध्वनी करून सांगितले आम्ही येतो,आमच्या विमानातून तुम्ही मुंबईला चला. 

मुनगंटीवार यांनी तेवढया वेळात आणखी काही महत्वाच्या मंडळींशी संपर्क साधला ,प्रचाराची वास्तपुस्त केली.वेळेचा सदुपयोग झाला तेवढयात मुख्यमंत्री फडणवीसांचे विमान नांदेडला पोहोचले.विमानात बसताच नांदेडची चर्चा झाली.तिथे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना असंतोषाचा सामना करावा लागतो आहे. थेट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जेरीला आले आहेत  . चिखलीकरांनी  जरा आणखी जोर कसा लावायचा याची चर्चा झाली. 

मग कॉंग्रेसमधल्या अंतर्गत कलहाचा विषय निघाला .त्याची सविस्तर चर्चा रंगली . नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला नांदेडातून साथ मिळेल काय याचा आढावा घेतला गेला. विमान हवेत उडाले ,बाहेर डोकावताना काळे ढग दिसत होते अन चमचमणाऱ्या विजाही . तांत्रिक त्रुटीचे विमान अडचणीचे ठरले असते हे दिसत होते. एक हाक देताच फडणवीस आले याची मुनगंटीवारांनी मन:पूर्वक नोंद घेतली होतीच ,त्याला शब्द रूप देत ते म्हणाले ," राजकारणात हेवेदावे इतके की कुणी कुणाला मदत करायला पहात नाही.आम्ही एक आहोत,अडचणीत लगेच हाकेला ओ देतो, मुख्यमंत्री लगेच आले .ही आमची पार्टी विथ डिफरन्स संस्कृती आहे."
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com