'बेस्ट' संपाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेला केले चीतपट

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी नारायण राणे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार कपिल पाटील आदींनी वाटाघाटीबाबत चर्चा केली. शिवसेनेला या प्रक्रियेत डावलून भाजपने राजकीय खेळी केली.
Fadanvis_Thakrey
Fadanvis_Thakrey

मुंबई :  बेस्ट कामगारांच्या संपात शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्षाची झलक दिसली. कामगार नेते शशांक राव यांनी कामगारांच्या प्रश्‍नात पडू नये. आम्ही कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी समर्थ आहोत, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने तिथेच संपाची ठिणगी पडली आणि शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले. 

बेस्ट कामगारांच्या संपाच्या निमित्ताने मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चीतपट केल्याचे दिसून आले.
आमच्या प्रश्‍नावर सामोपचाराने तोडगा काढा, अशी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मागणी होती. बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी त्या दृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या. 

मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्याचे दिसताच महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासमवेत चर्चा झाली. बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त उपस्थित होते. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी 570 कोटींचे पॅकेज कामगारांच्या शिष्टमंडळाने मागितले. 

त्यावर प्रशासनाने 150 कोटींच्या वर एक रुपयाही देणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर कामगार संघटनांनी तडजोड करण्याची मागणी केली. त्या वेळी पालिकेनेही मदत करण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला देण्यासाठी पालिकेकडे काहीही नाही, अशी भूमिका मांडत हात झटकले.

 बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. कर्ज घेऊन कामगारांचे वेतन देत असल्याचे महाव्यवस्थापकांनी  स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी 350 कोटी रुपयांच्या पॅकेजवर तडजोड केली असती तर आम्ही तयार होतो, अशी माहिती कामगार प्रतिनिधींनी दिली.

दरम्यान, ऍड. दत्ता माने यांनी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. संप 8 जानेवारी रोजी जाहीर केला तेव्हा मुख्यमंत्री दिल्लीत होते. संप लांबत चालल्याचे लक्षात येताच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली. 

शनिवारी वेतन करार, बेस्टचे विलीनीकरण यावर या समितीत वाटाघाटी सुरू झाल्या. वाटाघाटी सुरू असताना उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि माजी न्यायमूर्तींची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली.

 मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी नारायण राणे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार कपिल पाटील आदींनी वाटाघाटीबाबत चर्चा केली. शिवसेनेला या प्रक्रियेत डावलून भाजपने राजकीय खेळी केली. अखेर संप विजयाचा जल्लोष कामगार संघटनांनी केला. त्यात शिवसेनेची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले.

कामगार संघटनांचा नाइलाज
शिवसेनेला शशांक राव यांचा हस्तक्षेप नको होता. त्यांनी संप प्रकरणात पडू नये, अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यामुळे शिवसेना काहीही देणार नाही हे स्पष्ट होते. प्रशासनाने हात वर केल्यामुळे कामगार संघटनांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला. शिवसेनेच्या भूमिकेमुळे चिडलेल्या कामगार संघटनांनी नाइलाजास्तव संपाचे हत्यार उपसल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com