"फ्री होल्ड' निर्णयाने नवी मुंबईत भाजप बाळसे ?

"फ्री होल्ड' निर्णयाने  नवी मुंबईत भाजप बाळसे ?

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नवी मुंबईतील एका कार्यक्रमानिमित्त सिडको व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुंबईतील सर्व जमीन फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाच्या अंमलबजावणीस विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे फ्री होल्डच्या निर्णयामध्ये गावठाणांचा तसेच कुकशेत गावाचा समावेश नसल्याने मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय केवळ सिडको निर्मित गृहनिर्माण सोसायट्या आणि साडे बारा टक्के भूखंडावरील गृहनिर्माण सोसायट्यांपुरताच सीमित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत भाजपाच्या बेलापूर मतदारसंघातील आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये निर्णय जाहीर केला. या निर्णयाबाबत सिडको मुख्यालयात चौकशी केली असता, मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा स्तुत्य असली तरी फ्री होल्डबाबतचा ठराव सिडकोच्या संचालक कार्यकारिणी मंडळामध्ये संमत करून तो मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. हा फ्री होल्डचा निर्णय केवळ सिडको निर्मित इमारती आणि साडे बारा टक्केच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारती यापुरताच सीमित असल्याचे सिडको अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

या निर्णयामध्ये नवी मुंबईतील गावठाणाचा व कुकशेत गावाचा समावेश नसल्याने ग्रामस्थांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत झाले नाही. मुख्यमंत्री लवकरच गावठाणाचाही प्रश्‍न निकाली लावतील असा आशावादही यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला. नवी मुंबईतील गावठाणांचे अद्यापि सिडकोकडून सिमाकंनच झाले नसल्याने गावठाणाला तूर्तास फ्री होल्डच्या निर्णयाचा फायदा होणार नाही. लवकरच सिडकोकडून गावठाणांच्या सिमाकंनाबाबत सर्व्हेला सुरूवात होणार असून त्यानंतरच गावठाणालाही फ्री होल्डच्या निर्णयाचा फायदा मिळणार असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांकडून यावेळी देण्यात आली. 
इतर गावाची परिस्थिती व कुकशेतची परिस्थिती वेगळी आहे. कुकशेत गावाचा मालकी हक्क एमआयडीसीकडे आहे. कुकशेत गाव फ्री होल्ड केल्यानंतर त्याची माहिती सर्वप्रथम एमआयडीसीला देण्यात येईल. त्यानंतर त्या जमिनीचा निर्णय घेण्याचा अधिकार एमआयडीसीचा राहणार असल्याचे यावेळी सिडको अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. सिडकोकडून सुरूवातील सिडकोने बांधलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांबाबतच हा निर्णय घेण्याचे निश्‍चित केला होता, परंतु स्वत: मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केल्यामुळे आता साडे बारा टक्के भूखंडावरील सोसायट्यांनाही त्यांचा फायदा होणार असल्याची माहिती सिडकोतील अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. 

नवी मुंबईत भाजपचा एकच आमदार असला तरी मोदी लाटेमुळे अवघ्या 1200 निसटत्या मतांनी भाजपाला बेलापुरमध्ये विजय मिळाला आहे. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ 6वर अडकले. त्यामुळे या फ्री होल्डच्या निर्णयामुळे नवी मुंबईत भाजपाचा जनाधार वाढण्यास मदतच होणार असल्याचा आशावाद भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com