devdendra fadavanis aashta tour story | Sarkarnama

जयंतरावांचे सेनापती करणार फडणवीसांचा सत्कार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

विलासराव शिंदे यांनी सांगितले की, "मी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार आहे, मात्र तो अपर तहसिल कार्यालयाच्या उद्‌घाटन समारंभात करेन. तो कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नसेल. मुख्यमंत्री आमच्या गावी येताहेत, त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सत्कार केला पाहिजे. परंतू, मी त्यांच्या पक्षाच्या मेळावा होत असेल तर तेथे जाऊन सत्कार करणार नाही,' असे स्पष्ट केले. 

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जिल्ह्यातील सेनापती, अर्थात जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विलासराव शिंदे येत्या 27 ला मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार आहेत. श्री. शिंदे यांनी गेली 38 वर्षे स्वतंत्र आष्टा तालुक्‍याचे स्वप्न पाहिले. ते भाजपने पूर्ण केले. त्याबद्दल ते सत्कार करणार आहेत, अशी माहिती श्री. शिंदे यांचे चिरंजीव तथा भाजपचे आष्ट्याचे नेते वैभव शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हा सारा घाट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घडवून आणला आहे, हे विशेष. 

विलासराव शिंदे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार असून सध्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आष्ट्याला स्वतंत्र तालुका दर्जा ही त्यांची जुनी मागणी, मात्र आघाडी काळात ती पूर्ण झाली नाही. गेल्यावर्षी त्यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांनी याच मुद्यावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजप प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊंनी हा विषय मार्गी लावत आष्ट्याला अपर तहसिल कार्यालय मंजूर करून घेतले. ते दहा जुलैपासून सुरु झाले. त्याचे अधिकृत उद्‌घाटन 27 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. 

वैभव शिंदे म्हणाले, "शिंदेसाहेबांनी 38 वर्षे हे स्वप्न पाहिले आणि पाठपुरावा केला. त्याला भाजपने साथ दिली. त्यामुळे साहेब स्वतः येऊन सत्कार करणार आहेत. त्यांनी त्याला होकार दिला आहे.'' 
सदाभाऊ खोत म्हणाले, "यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना मोठा नागरी सत्कार आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे.'' 

 

संबंधित लेख