Detainment action on Mateen is just : Kishanchand Tanvani | Sarkarnama

 मतीनवरील  स्थानबध्दतेची कारवाई योग्यच  : किशनचंद तनवाणी

जगदीश पानसरे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

शहराचे वातावरण बिघडवण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असो त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला गेलाच पाहिजे .

-किशनचंद तनवाणी

औरंगाबादः " दोन समाजात तेढ निर्माण करून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने वारंवार केला. सभागृहात आणि सभागृहाबाहेर नेहमीच त्याचे वर्तन जातीय तणावाला खतपाणी घालणारे राहिले आहे. म्हणूच पोलीस प्रशासनाने त्याच्यावर केलेली स्थानबध्दतेची कारवाई योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो," अशा शब्दांत भाजचे शहर-जिल्हाध्यक्ष माजी आमदार किशनंचद तनवाणी यांनी पोलीसांचे समर्थन केले. 

17 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यास सय्यद मतीन याने विरोध केला होता. 'बाबरी मशीद गिराने वाले को क्‍या श्रध्दांजली देने की, मेरा विरोध है' असे विधान त्याने महापालिकेच्या सभागृहात केले होते. 

 "देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल सय्यद मतीनचे हे उदगार देशद्रोहा पेक्षा कमी नाही. मुळात बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेशी वाजपेयीजींचा संबंध जोडणे चुकीचे होते. त्याकाळात देशाचे पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव हे होते. पण केवळ अज्ञान आणि द्वेशभावनेतून त्याने श्रध्दांजली वाहण्यास विरोध केला. त्यामुळे सभागृहात ज्या भाजप नगरसेवकांनी मतीनला धडा शिकवला त्याचा आम्हाला अभिमान आहे. वन्दे मातरमला विरोध, मे महिन्यात शहरात उसळलेल्या जातीय दंगलीत सहभाग आणि ती भडकवण्यास देखील सय्यद मतीन हाच जबाबदार होता," असा आरोप श्री . तनवाणी यांनी केला . 

" वारंवार जातीय तणाव निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणे हा जणू मतीनचा उद्योगच बनला होता. त्यामुळे अशा प्रकारे सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या व्यक्तीवर झालेली स्थानबध्दतेची कारवाई योग्यच आहे. शहराचे वातावरण बिघडवण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असो त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला गेलाच पाहिजे," अशी अपेक्षा देखील तनवाणी यांनी व्यक्त केली.
 

संबंधित लेख