Desai - Maheta have duped state by 54 thousan crores - Munde | Sarkarnama

देसाई-मेहतानी केला 54 हजार कोटींचा भ्रष्टाचार- विरोधकांचा आरोप

संजीव भागवत :  सरकारनामा न्यूजब्युरो 
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

 देसाई-मेहतांच्या घोटाळ्यासंदर्भात नस्ती आणि सचिवांनी केलेल्या नोंदीची माहिती आणि त्यासाठीचे पुरावेही मुंडे यांनी सभागृहात मांडले . श्री .देसाई यांनी 12 हजार हेक्टर जमीन डीनोटीफाईड केला असल्याने त्यात 50 हजार कोटी रुपयांचा  भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी व्हावी आणि तोपर्यंत  मंत्र्याचा राजीनाम घ्या अशी मागणी मुंडे यांनी केली.

मुंबई  :गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई या दोघांनी मिळून तब्बल 54  हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप करत या दोन्ही मंत्र्याच्या राजीनाम्याची विरोधकांनी आज विधानपरिषदेत जोरदार मागणी केली.

 विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी 289 अन्वये देसाई-मेहतांनी केलेल्या भ्रष्टाचाराची बाब गंभीर असल्याचे सांगत त्यावर सभागृहात चर्चा व्हावी यासाठी प्रस्ताव मांडला होता. त्यावर मुंडे यांनी बोलताना दोन्हीही मंत्र्यानी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावर सभागृहात खोटी माहिती देत सभागृहाची दिशाभूल केली आहे.  त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, आणि दोन्ही प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची समिती नेमून चौकशी केली जावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसचे भाई जगताप यांनी मेहता यांचा एक नवीन जमीन घोटाळा सभागृहात सांगत तो चार  हजार कोटींचा असल्याचे सांगितले . हे पैसे राज्याच्या तिजोरीतून लुटले जातात यामुळे यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली. फडणवीस  सरकारमध्ये 38 मंत्र्यांपैकी 19 मंत्र्याच्या मंत्र्यावर आम्ही भ्रष्टाचाराचे नुसते आरोप केले नाहीत तर त्याविरोधात पुरावे दिले.  आता त्यात मेहता-देसाई या दोन मंत्र्याची भर पडली आहे .  या दोन मंत्र्यानी मिळून तब्बल 54 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याने त्यांचे राजीनामे घ्यावे व यावर चर्चा करावी अशी मागणी भाई जगताप यांनी केली.

 मात्र उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. यामुळे उपसभापतीनी 10 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभापतींनी पुढील कामकाज सुरू केले .त्यावेळी 289च्या प्रस्तावावर त्याचे निकष तपासून घ्यायला पाहिजेत,मात्र त्यावर प्रश्न आणि कोणाचे नाव घेत आरोप करणे योग्य नसल्याचे सांगितले. 

त्यावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी 289 हा प्रस्ताव सरकारशी संबंध आणि तातडीचा विषय असल्याने ते स्पष्ट करताना विभाग आणि संबधीत व्यक्ती येतो असे स्पष्ट केले, त्यानंतर सभापतींनी हा प्रस्ताव उपसभापतीनी यापूर्वीच नाकारला असल्याचा दाखला देत पुढील कामकाज पुकारले.   

त्यानंतरही मुंडे यांनी उभे राहून दोन्ही मंत्र्यानी सभागृहात खोटी माहिती देत या सार्वभौम सभागृहाचीही दिशाभूल केली असून त्यांचे राजीनामे झालेच पाहिजेत  अशी मागणी लावून धरली.  त्याच दरम्यान विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली असतानाच सभापतींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्रीपतराव देसाई यांच्या कार्याच्या गौरवाचा प्रस्ताव पुकारला..

संबंधित लेख