Deputy director Wankhede will be arrested any moment | Sarkarnama

पावणेदोन कोटींच्या लाचप्रकरणी उपसंचालक वानखेडे यांना कोणत्याही क्षणी अटक  

पांडुरंग सरोदे 
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांना अखेर निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले.

पुणे  :  जमिनीच्या प्रकरणामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तब्बल एक कोटी 70 लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात सहआरोपी असलेले पुणे विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. त्यामुळे आता वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता आहे.

 वकिलामार्फत एक कोटी 70 लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप असलेले  भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांना अखेर निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले.

पर्वती येथील एका कोट्यवधी रुपये किंमतीच्या जागेप्रकरणी भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयात अपिलावर सुनावणी सुरू होती. या कार्यालयातून मिळकत पत्रिकेवर नाव नोंदवून देण्यासाठी वकिल रोहित शेंडे याने तक्रारदाराकडे दोन कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेंडे याला एक कोटी 70 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. 

 ऍड. शेंडे हा नेमका कोणासाठी काम करत होता, त्याने कोणाच्या सांगण्यावरून लाच घेतली, याचा तपास 'एसीबी'कडून सुरू होता. त्यानुसार सुरवातीपासून वानखेडे यांच्यावर 'एसीबी'चा संशय होता.

 दरम्यान ऍड.शेंडे व वानखेडे यांच्यात फोनवर झालेले संभाषण आणि भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकारी-कर्मचारी यांच्या चौकशीमध्ये वानखेडे यांचे नाव पुढे येत होते. दरम्यान, 'एसीबी'कडून अटक होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन वानखेडे यांच्याकडून न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. 

दरम्यान शुक्रवारी या अर्जावर न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. 'एसीबी'च्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळण्यास विरोध दर्शवीत, जामीन मिळाल्यास पुरावे नष्ट करण्याबरोबरच साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असा दावा केला. हा दावा ग्राह्य धरत न्यायालयाने वानखेडे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे 'एसीबी'चे पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी स्पष्ट केले. वानखेडे यांना कधीही अटक होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, छातीत दुखू लागल्याने दोन दिवसांपूर्वी वानखेडे यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचारादरम्यान तब्येत अधिक बिघडल्याने खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. वानखेडे यांच्यावर सध्या पुण्यातील वानवडी भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख