Delhi politics | Sarkarnama

सांप्रदायिक शक्तींच्या मुकाबल्यासाठी आणाभाका 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

समाजवादी विचारवंत कै. मधू लिमये यांच्या 95 व्या जयंतीचे निमित्त साधून डाव्या, प्रगतिशील, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राजकीय पक्षांना एकत्रित आणण्याच्या कार्यक्रमात कोणतीही ठोस फलनिष्पत्ती निघू शकली नाही. परंतु देशासमोर सांप्रदायिक शक्तींनी उभे केलेले संकट अवाढव्य असल्याने त्याचा एकत्रितपणे मुकाबला करण्यासाठी उपस्थित नेत्यांनी आणाभाका मात्र घेतल्या. 

नवी दिल्ली : समाजवादी विचारवंत कै. मधू लिमये यांच्या 95 व्या जयंतीचे निमित्त साधून डाव्या, प्रगतिशील, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राजकीय पक्षांना एकत्रित आणण्याच्या कार्यक्रमात कोणतीही ठोस फलनिष्पत्ती निघू शकली नाही. परंतु देशासमोर सांप्रदायिक शक्तींनी उभे केलेले संकट अवाढव्य असल्याने त्याचा एकत्रितपणे मुकाबला करण्यासाठी उपस्थित नेत्यांनी आणाभाका मात्र घेतल्या. 

कार्यक्रमात मुख्यतः पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील नेते, दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे नेते, कॉंग्रेसचे दिग्विजयसिंह, बहुजन समाज पक्षाचे सुधींद्र भदौरिया हे उपस्थित होते. लिमये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षातर्फे कोणीही प्रतिनिधी कार्यक्रमात सामील नव्हता. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डी. पी. त्रिपाठी, संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव, माजी न्यायमूर्ती राजेंद्रसिंग सच्चर आणि इतिहासकार इरफान हबीब यांनी यानिमित्ताने विचार व्यक्त केले. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या विरोधात कॉंग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष व प्रगतिशील लोकशाहीवादी राजकीय शक्तींची महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांची चर्चा सुरू झाली आहे. त्याची पहिली पायरी म्हणून राष्ट्रपतिपदासाठीच्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे संयुक्त उमेदवार देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर येचुरी यांनी या सभेत राष्ट्रपतिपदासाठी संयुक्त उमेदवार देऊन या एकत्रित संघर्षाचे पहिले पाऊल टाकण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. या देशाला राज्यघटनेच्या आधारे कामकाज करणारा आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रपती हवा की सांप्रदायिक राष्ट्रपती हवा याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रपतींना मर्यादित अधिकार असले तरी ते राष्ट्रप्रमुख असतात आणि त्यामुळेच या पदासाठी धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील व्यक्तीची निवड करणे आवश्‍यक आहे असे त्यांनी सांगितले. 

इरफान हबीब यांनी त्यांच्या प्रास्ताविकात देशाला पुराणमतवादी शक्तींकडून धोका उत्पन्न झाल्याचे सांगून त्याचा केवळ मुकाबला न करता त्यास पराभूत करण्यासाठी प्रगतिशील विचाराच्या शक्तींनी एकत्र येण्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती सच्चर (वय93) यांनी व्यासपीठावरील नेत्यांना "नुसते विचार करीत न बसता कृती करा!' असा संदेश देताना विरोधी पक्ष प्रयत्न करताना दिसले तर जनता तुमच्या मागे येईल असा उपदेश केला. दिग्विजयसिंह व शरद यादव हे सर्वांत शेवटी बोलले आणि त्यांनी देखील सच्चर व हबीब यांच्या अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद दिला. लिमये यांचे चिरंजीव अनिरुद्ध यांनी उपस्थित नेत्यांना काहीशा कानपिचक्‍या दिल्या. विरोधी पक्षांकडे तरुण आकर्षित का होत नाहीत, याबाबत विचार करण्याचे आवाहन केले. संघटन, आंदोलन आणि निवडणुकीच्या माध्यमाला प्राधान्य देण्याबरोबरच नव्या बदलत्या काळाच्या प्रश्‍नांना हात घालणे आणि त्यावर उत्तरे शोधणे हे न केल्यास विरोधी पक्षांचीच पीछेहाट होईल असे सांगितले. 
 

संबंधित लेख