Delhi morcha preparation : Raju Shetty | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या आवाजाने दिल्ली हादरली पाहिजे : राजू शेट्टी 

श्रीकांत पाचकवडे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

आपल्या न्याय्य हक्कासाठी देशातील शेतकरी आता पेटून उठला आहे. आता आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करा, नाही तर 2019 च्या निवडणुकीत शेतकरी तुमचे "बुरे दिन' आणल्याशिवाय राहणार नाही. 20 नोव्हेंबरला दिल्लीतील रामलिला मैदानावर किसान मुक्ती यात्रेचा भव्य मोर्चा आयोजित केला असून या मोर्चात देशभरातील लाखो शेतकरी सहभागी होणार असल्याचे खासदार शेट्टी म्हणाले.  

 

अकोला : भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात देशातील शेतकरी पेटून उठला आहे. आता "आर या पार' ची लढाई असून 20 नोव्हेंबरला दिल्लीत आयोजित किसान मुक्ती यात्रेच्या मोर्चात सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे. कुंभकर्णी झोपत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आवाजाने दिल्ली हादरली पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे तसेच उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा यासाठी देशातील 180 शेतकरी संघटनांना एकत्र करून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात सुरू केलेल्या किसान यात्रेच्या तिसऱ्या टप्यात उत्तर प्रदेशातील मेरठ येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

यावेळी अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे नेते व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, राजस्थानचे शेतकरी नेते रामपाल जाट, डॉ. सुनीलम्म, बापू कारंडे, प्रल्हाद इंगोले, जगदीश इनामदार, मयुर बोरडे, प्रशांत सोनावणे, रवी उंडाळे, अमोल हिप्परगे, बबलू शेख उपस्थित होते. 

यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, की "अच्छे दिन'च्या भुलथापा देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, सत्ता मिळाल्यावर त्यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला. त्यामुळेच शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचे पाप करणाऱ्यांची साथ सोडली. वाढती महागाई, शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबविण्यास सरकार अपयशी ठरले आहे. केवळ दिखावेगिरी करून जनतेचे भलं होत नाही. तुमच्या कथनी आणि करनितील फरक शेतकऱ्यांनी ओळखला आहे. चहा विकणाऱ्यांना शेतकरी पंतप्रधान करू शकतात तर तेच शेतकरी वेळप्रसंगी पुन्हा चहा विकायला पाठवू शकतात असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. 
 

संबंधित लेख