deepak mankar`s dream shattered | Sarkarnama

तुरुंगवारीमुळे राष्ट्रवादीचा पुणे शहराध्यक्ष होण्याचे मानकरांचे स्वप्न भंगले 

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातर्गंत (मोक्का) कारवाई झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पुणे शहराध्यक्ष होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दही धोक्‍यात आल्याचे बोलले जात आहे. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातर्गंत (मोक्का) कारवाई झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पुणे शहराध्यक्ष होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दही धोक्‍यात आल्याचे बोलले जात आहे. 

मूळचे कॉंग्रेसवासी असलेले मानकर खरे तर आमदार होण्याकरिताच राष्ट्रवादीत दाखल झाले. तेव्हा, कॉंग्रसचे नगरसेवक असल्याने पदाचा राजीनामा देऊन 2014 मध्ये त्यांनी कसब्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात दंड थोपटले. या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर महापालिकेची पोटनिवडणूक लढवून ती जिंकली. त्यामुळे मानकर हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळ गेले. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीत मानकरांचे वजनही वाढले. 

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. परिणामी, पक्ष संघटनेची ताकद कमी झाल्याचे जाणवले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी संघटना मजबूत करण्याचा नेतृत्वाचा इरादा होता. त्यातच राष्ट्रवादीच्या विद्यमान शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांची राज्यसभेवर दुसऱ्यांना निवड झाल्याने शहराध्यक्ष बदलाचे संकेत मिळाले.

शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत मानकर यांच्यासह 13 जण होते. मात्र, मानकर यांचेच नाव आघाडीवर असल्याने शहराध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याचा अंदाज होता. भाजप सरकारविरोधातील पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात मानकर यांनी कोथरुड आणि कसब्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संघटना मजबूत करण्यासोबत ती वाढविण्यासाठी मानकर हे शहराध्यक्षपदासाठी योग्य असल्याचा सूर स्थानिक नेत्यांचा होता. त्यामुळे मानकरांचे नाव निश्‍चित मानले जात होते. 

जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या कारणावरून मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून मानकर फरारी होते. या काळात अजित पवार यांनी मानकर यांचे समर्थन केले होते. मात्र, "कायद्यापुढे कोणी मोठा नसतो. त्यामुळे मानकरांनी पोलिस चौकशी सामोरे जावे,' असा सल्ला अजितदादांनी त्यांनी दिला होता. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली होती. पक्षाचे नेते पाठीशी असल्याने मानकर यांना न्यायालयाचा दिलासा दिल्यानंतर तेच शहराध्यक्ष होतील, अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानकर शरण आले. त्यांच्याविरोधात "मोक्का'ची कारवाई झाल्याने शहराध्यपदाच्या मानकरांच्या स्वप्नाला पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मोक्का कारवाई झाल्यामुळे त्यांना बराच काळ तुरुंगात राहावे लागणार आहे. या कायद्यात जामीन मिळणे अवघड जाते. पोलिसांनी मानकर यांच्यावर कडक कारवाई करून "लॅंड माफियां'च्या विरोधात कठोर धोरण असल्याचे दाखवून दिले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख