deelpkumar sandanda | Sarkarnama

भाजपला शह देण्यासाठी दिलीपकुमार सानंदा यांना कॉंग्रेसकडून बळ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

खामगाव मतदार संघात कॉंग्रेस मधील कोणताही निर्णय हे दिलीपकुमार सांनंदा घेतात. त्यांना पक्षात आजवर कोणी प्रतिस्पर्धी नव्हता आता मात्र आता मागील विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस मध्ये घरवापसी केलेले संजय ठाकरे पाटील विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे सानंदा यांनी सावध पवित्रा घेत संघटनेवर आपली पकड आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे.

खामगाव : राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे कॉंग्रेसचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने सानंदा यांना पुन्हा बळ देत भाजपला शह देण्याची रणनिती आखली आहे. बुधवारी खामगावातील संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेऊन दिलीपकुमार सानंदा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे राणा दिलीपकुमार सानंदा यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि भाऊसाहेब फुंडकर यांचे सुपूत्र आकाश फुंडकर हे आमदार बनले. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आणि सानंदा याचे राजकीय विरोधक भाऊसाहेब फुंडकर याची कृषिमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे भाजपाला खामगाव मतदार संघात नवी उभारी मिळाली आणि त्यानंतर सानंदा यांचा एकछत्री अंमल संपला. 

नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत दिलीपकुमार सानंदा यांना अपयश आले. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव संस्था कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. सत्ता गेल्यावर सानंदा अडचणीत आणले गेले. जुनी प्रकरणे भाजपने बाहेर काढली. सानंदा यांचे अटक प्रकरण चांगलेच गाजले. आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत सानंदा यांनी आरोप फेटाळून लावत दिल्ली गाठून जामीन मिळवला. 

अटक प्रकरणानंतर नागरिकांकडून व्यक्त होणारी सहानुभूती सानंदा यांना मिळाली. राजकारण म्हटले की चढ-उतार येतातच. त्यामुळे अटक प्रकरणातून बाहेरून येत सानंदा पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सानंदा यांना सत्ता हवी आहे. त्यासाठी ते कामाला लागले असून खामगाव मतदार संघात त्यांनी संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजप विरोधात महागाईसह इतर कारणांनी जनतेत नाराजी असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी सानंदा रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. 

खामगाव मतदार संघात कॉंग्रेस मधील कोणताही निर्णय हे दिलीपकुमार सांनंदा घेतात. त्यांना पक्षात आजवर कोणी प्रतिस्पर्धी नव्हता आता मात्र आता मागील विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस मध्ये घरवापसी केलेले संजय ठाकरे पाटील विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे सानंदा यांनी सावध पवित्रा घेत संघटनेवर आपली पकड आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे. " शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही ' असे आपल्या खास स्टाईलमध्ये सांगत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आगामी विधानसभेवर दावा करत आहेत. 
पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकेल 
भाजपने निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन अद्यापही पूर्ण केलेले नसून कॉंग्रेसच्या जुन्या योजनांचे नांव बदलून त्या योजना पूर्ण करत आहे. हळूहळू लोकांना आपल्या हातून झालेली चुक लक्षात येत असून सत्ताधायांचा विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. कमल का फुल ही जनतेची मोठी भूल ठरली आहे. आगामी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसची एक सक्षम टिम तयार करण्यात आली असून खामगाव मतदार संघात पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्‍वास दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केला. 

संबंधित लेख