दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला पाहता? : अशोक चव्हाण 

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला पाहता? : अशोक चव्हाण 

औरंगाबाद : मराठवाड्यातील 76 पैकी 56 तालुक्‍यामध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली असून, खरिपाची पिके हातची गेली आहेत. पाणी, चाराटंचाई, मजुरीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री 31 ऑक्‍टोंबच्या मुहूर्ताची वाट कशाला पाहत आहेत? असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता.13) केला. 

मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शासनाने एकरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठवाडा, विदर्भ, खान्देशच्या दुष्काळासंदर्भात कॉंग्रेसची चिंतन बैठक शनिवारी औरंगाबाद येथे घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण पुढे म्हणाले, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची मोठी दाहकता आहे. शासनाने मात्र आठपैकी पाच जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त दाखवून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. 

शास्त्रीय पद्धतीने केंद्र शासनामार्फत दुष्काळ जाहीर करण्यात येईल, राज्य सरकार 31 ऑक्‍टोबरला दुष्काळजन्य स्थिती जाहीर करेल, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. सरकारकडे पैसा नसल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. 

संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, थकबाकीमुळे शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, ही कारवाई थांबविण्यात यावी, कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, बोंडअळीचे अनुदान तातडीने द्यावे, या मागण्यांसाठी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेतला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. 

महाराष्ट्राचा कोळसा वळवला 

राज्यात भीषण वीज टंचाई निर्माण झाली असून, कोळसा नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथे महाराष्ट्राचा कोळसा वळविण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com