Datta Meghe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

दत्ता मेघे भाजपमध्ये नाराज? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

कॉंग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत दाखल झालेले माजी खासदार दत्ता मेघे नाराज असून त्यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या (ता. 20) नागपुरात बोलाविला आहे. भाजपच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

नागपूर : कॉंग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत दाखल झालेले माजी खासदार दत्ता मेघे नाराज असून त्यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या (ता. 20) नागपुरात बोलाविला आहे. भाजपच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा कॉंग्रेस व भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या दत्ता मेघे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. या बदल्यात त्यांचे सुपुत्र समीर मेघे यांना हिंगणा (जि. नागपूर) विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. ते या मतदारसंघातून निवडून आले. 

भाजपत प्रवेश करण्यापूर्वी काही महिन्यांनी दत्ता मेघे यांना राज्यपालपद देण्याचे भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी आश्‍वासन दिल्याचे समजते. या आश्‍वासनाची अद्यापही पूर्तता झाली नाही. केंद्रातील सरकारला तीन वर्षे झाल्यानंतरही कोणत्याही हालचाली न झाल्याने सिनिअर मेघे नाराज असल्याचे बोलले जात आहे. 

या नाराजीला तोंड फोडण्यासाठी दत्ता मेघे यांनी विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा मेळावा आयोजित केला आहे. मेघे यांची ही स्वतंत्र सामाजिक संघटना असून राजकीय दबाव टाकण्यासाठी या संघटनेचा ते नेहमीच वापर करतात. परिषदेच्या मेळाव्यात स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषयावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. हे दोन्ही विषय भाजपसाठी अडचणीचे ठरले आहेत. या दोन्ही विषयावर भाजपने भूमिका स्पष्ट न केल्यास नजीकच्या काळात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. या राजकीय भूमिकेमुळे भाजपमध्ये सिनिअर मेघे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आमदार समीर मेघे यांना मंत्रिपद देण्यात यावे, यासाठीही प्रयत्न झाला होता. परंतु समीर मेघे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता नसल्यानेही ही नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित लेख