जाफ्राबाद तालुक्‍यातील पिछाडी रोखण्यासाठी दानवे पिता-पुत्रांचे शर्थीचे प्रयत्न

जाफ्राबाद तालुक्‍यातील पिछाडी रोखण्यासाठी दानवे पिता-पुत्रांचे शर्थीचे प्रयत्न

औरंगाबाद : भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील जाफ्राबादच्या काही भागातून सातत्याने भाजपची पिछेहाट होत आली आहे. 2009 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला यांच्या पराभवाला याच तालुक्‍यातील टेंभुर्णी सर्कल कारणीभूत ठरले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिरंजीव संतोष दानवे सात हजार मतांनी विजयी झाले असले तरी जाफ्राबादकरांनी दानवे यांच्यावरील आपला राग पुन्हा मतपेटीतून व्यक्त केला होता. आगामी निवडणुकीत जाफ्राबादकरांची नाराजी दूर करून मताधिक्‍य वाढवण्यासाठी दानवे पिता-पुत्रांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात रावसाहबे दानवे यांनी बराच निधी खेचून आणला. यापैकीच आढा ते भडगाव या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून त्याचे काम सुरू झाले. या प्रसंगी दानवे पिता-पुत्रांनी हजेरी लावत नारळ वाढवला. रावसाहेब दानवे यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले. अनेक निवडणुकांमध्ये त्यांना अनपेक्षित पराभव आणि धक्के देखील पचवावे लागले. या धक्‍यामध्ये जाफ्राबाद तालुक्‍यातील काही भागाची भूमिका महत्वाची होती. 

भोकरदन-जाफ्राबाद असा दोन तालुक्‍यांचा मिळून हा मतदारसंघ असल्यामुळे कधी तरी जाफ्राबाद तालुक्‍याला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जायची. पण इथे रावसाहेब म्हणतील तोच कायदा असल्यामुळे या मागणीकडे फारसे लक्ष कधी दिले गेले नाही. परिणामी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पत्नी निर्मला दानवे यांचा दारूण पराभव झाला. दानवे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. अर्थात या धक्‍यामध्ये जाफ्राबाद तालुक्‍यातील टेंभुणी सर्कलचा मोठा वाटा होता. त्यानंतर आमदारकी मागणाऱ्या जाफ्राबाद तालुक्‍याची दोन वर्षापूर्वी दानवे यांनी विजय परिहार यांना रामेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन करत बोळवण केली. 

2014 मध्ये चिरंजीव संतोष दानवे यांना उमेदवारी देत रावसाहेब यांनी पुन्हा घरातच सत्ताकेंद्र ठेवण्याची चाल खेळली. मोदी लाटेत त्यांची ही खेळी यशस्वी ठरली देखील. पण जाफ्राबादकरांची नाराजी मात्र कायम होती. युती नसल्यामुळे शिवसेनेने जाफ्राबाद येथील रमेश गव्हाड या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि त्याने दहा दिवसांच्या प्रचारातच 35 हजारांवर मते मिळवली. अगदी दानवे राहत असलेल्या भोकरदनमध्येही गव्हाड प्रभावी ठरले होते. संतोष दानवे सात हजार मतांनी विजयी झाले असले तरी जाफ्राबाद तालुक्‍यातून ते पिछाडीवर असल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले होते. 

दानवेंकडून पॅचअपचे प्रयत्न? 
आगामी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत दानवे पिता-पुत्रांपुढे विरोधकांचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्यावेळी हे दोघेही मोदी लाटेत तरले होते, पण आता ती लाट नाही, त्यामुळे तरायचे असेल तर स्वतःलाच हातपाय मारावे लागणार याची जाणीव दानवे यांना झाली आहे. तेव्हा ज्या भागातील मतदार आपल्यावर नाराज आहेत त्यांना खूष करण्याचे प्रयत्न या दोघांनीही सुरू केल्याचे दिसते. 

पॅचअपचा भाग म्हणूनच जाफ्राबाद तालुक्‍यातील त्यांच्या रविवारच्या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. आढा ते मढगाव रस्त्याच्या कामांची सुरवात झल्यावर दानवे पिता-पुत्र समर्थकांनी त्यांची थेट घोड्यावरून मिरवणूक काढत जल्लोष केला. जाफ्राबादकरांची आता तुमच्यावर कुठलीच नाराजी नाही असे चित्र यातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता घोड्यावरून मिरवणूक काढणाऱ्या जाफ्राबादकरांची दानवे यांच्या विरोधातील नाराजी खरेच दूर झाली की त्यांनी देखील आपल्या नेत्याला "चकवा' दिला हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com